नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू बेपत्ता असल्याचे पोस्टर्स त्यांच्या मतदारसंघात लागले आहेत. सिद्धूंना शोधल्यास 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, असे पोस्टर्सवर लिहिले आहे. हे पोस्टर्स पाहून तरी त्यांना मतदारसंघाची आठवण येईल, असे येथील नागरिकांनी म्हटले.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यानही शहरातील लोकांना भेडसावत असलेल्या समस्यांकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या मतदारसंघात विकासकामे झाली नाहीत. सिद्धू हे बराच काळ आपल्या मतदारसंघातून गायब असतात, असा आरोप अनिल वशिष्ठ यांनी केला आहे. आपण अमृतसरच्या पूर्व मतदारसंघातून ते आमदार असल्याचे ते विसरून गेल्याचेही वशिष्ट म्हणाले. तसेच जो कोणी सिद्धू यांना शोधून आणेल त्याला 50 हजार रुपये बक्षिस देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली असून तसे पोस्टर्सही चिपवकले आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांचं मुख्यमंत्र्याविरोधात बंड
पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडागंजी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. काँग्रेसमधील कलह मिटवण्यासाठी मंत्री, आमदार, नेत्यांच्या दिल्लीत गाठीभेटी सुरू आहेत. मंगळवारी काकँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिल्लीत हायकमांडकडून गठीत करण्यात आलेल्या तीन सदस्यीय पॅनलसोबत चर्चा केली होती.