पुणे : आजही आपण जर पाच वर्षापूर्वीच्या त्या महामारीबाबत विचार केला तर अंगावर काटा येतो. अनेकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना या महामारीमध्ये गमावलं. अनेकांना त्या व्यक्तीच्या जवळ जाता आलं, ना त्यांना खांदा देता आला. जग एक ते दोन वर्ष शांत झालं होतं. रस्त्यावर फक्त आणि फक्त रुग्णवाहिका आणि त्यात रुग्ण जात होते. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्ती मास्क लावून चार हात लांब थांबत होत्या. आपण जगात पाच वर्षापूर्वी आलेल्या कोरोना महामारीबाबत बोलत आहोत.
कोरोनाचा विषाणू नेमका आला कुठून? : कोरोना महामारीत जगात जवळपास २ कोटीहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. मात्र, कोरोनाचा विषाणू नेमका आला कुठून याबाबत आजही चर्चा केली जात आहे. असं असताना, डॉ. मोनाली रहाळकर-बहुलीकर आणि डॉ. राहुल बहुलीकर यांनी याबाबत संशोधन करत आता यावर पुस्तक लिहिलं. त्यांच्या या पुस्तकात कोरोनाचा विषाणू हा नैसर्गिक आहे की तो चीनमधील वुहान येथील प्रयोग शाळेमधूनच आला या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
"तो नक्की कुठून आला?" : डॉ. मोनाली रहाळकर-बहुलीकर आणि डॉ. राहुल बहुलीकर यांनी लिहिलेल्या "तो नक्की कुठून आला?" या पुस्तकात कोविडच्या उगमाचे रहस्य आणि वास्तव २ मार्चला प्रकाशित होणार आहे. डॉ. मोनाली रहाळकर यांनी या पुस्तकात स्वतः याबाबत संशोधन करत कोरोनाचा विषाणू हा नैसर्गिक नसून तो चीनमधील वुहान येथील प्रयोग शाळेमधूनच आला असल्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. त्याबद्दल बहुलकर यांचं संशोधन काय सांगतं ते पुस्ताकात आहे.
२०२० साली शोधनाला सुरूवात : याबाबत डॉ. मोनाली रहाळकर म्हणाल्या की, "जेव्हा कोरोनाची महामारी सुरू झाली आणि जग ठप्प होऊन लॉकडाऊन लागलं, तेव्हा आम्ही याबाबत संशोधनाला सुरूवात केली. चीनमधील एका खाणीत २०१२ साली जेव्हा सहा लोक तिथं गेले आणि वटवाघुळची विष्टा साफ करता करता त्यांचा मृत्यू झाला. तेथील विषाणू हे वुहान येथील प्रयोगशाळेत आणले गेले आणि त्या प्रयोगशाळेतून या विषाणूचा उगम झाला असावा या निकषपर्यंत काहीजण आले. या संशोधनाची सुरूवात आम्ही २०२० साली सुरू केली. कोरोनाबाबत नैसर्गिक संक्रमणाचे पुरावे समोर येत नव्हते आणि मग वुहानमधील प्रयोगशाळेतून विषाणू आला आहे का? याबाबत संशोधन सुरू केलं आणि पुढे याचं संशोधन करत अनेक गोष्टी समोर आल्या.
नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं : यावेळी डॉ. राहुल बहुलीकर म्हणाले, "वुहानमधील प्रयोगशाळेत वेगवेगळ्या वटवाघुळांवर प्रयोग सुरू आहेत. तिथे ते नवनवीन विषाणू तयार करत आहेत. नवीन विषाणूंना मानवात संक्रमित करणे या प्रकारचे प्रयोग केले जात आहेत जे खूप घातक आहेत. जर covid सारखाच विषाणू पुन्हा नव्याने बाहेर पडला तर पुन्हा एकदा जगात महामारी पाहायला मिळणार आहे. त्यामुळं त्यांचं हे काही संशोधन सुरू आहे ते थांबलं पाहिजे, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून जे काही सुरू आहे ते मांडण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकात केल्याचं यावेळी डॉ. राहुल बहुलीकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -