हैदराबाद - 'केजीएफ' या गाजलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत नील यानं ज्युनियर एनटीआरला घेऊन आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केलीय. या चित्रपटाचं तात्पुरतं शीर्षक 'एनटीआरनील' असणार आहे. भव्य प्रमाणात बनत असलेल्या या चित्रपटाचं बजेटही खूप मोठं असणार आहे. एनटीआर याच्या प्रत्येक चित्रपटासाठी मोठं बजेट असतं, तसंच ते प्रशांत नीलच्या चित्रपटाबाबतीतही खरं आहे. आता हे दोघं एकत्र आल्यानं एक नेत्रदीपक आणि भव्य चित्रपट बनत असल्याची खात्री त्यांच्या चाहत्यांनी बाळगली आहे.
अलिकडच्या काळात चित्रपट उद्योगात काही भव्य चित्रपटांच्या निर्मिती झाल्या आहेत, परंतु तेलुगू अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या हा अॅक्शनपट एक वरच्या पातळीवर घेऊन जाणारा आहे. या चित्रपटाचे बजेट ३६० कोटी रुपये आहे. हा आतापर्यंतच्या सर्वाधिक बजेट असलेल्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स हे त्याचे भव्य स्वरूप स्पष्ट करणारे आहेत. याच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी आधीच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
निर्मात्यांनी अलिकडेच हाय ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्ससह शूटिंगला सुरुवात केली, ज्यावरुन त्याच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट झालेल्या या दंगलीच्या दृश्यात अंदाजे ३००० लोकांच्या जमावाचा समावेश होता. यावरुन हा चित्रपट निर्मितीमध्ये नवीन बेंचमार्क निर्माण होत असल्याचं स्पष्ट झालंय.
प्रशांत नील यानं चित्रपट निर्मितीच्या त्याच्या लार्जर-दॅन-लाइफ दृष्टिकोनातून दिग्दर्शन एक पाऊल पुढे नेलं आहे. 'केजीएफ' फ्रँचायझीसारख्या चित्रपटांमधून त्यानं भव्यतेचा सिलसिला सुरू केला. आता त्याच्या बरोबर एसएस राजामौलीच्या 'आरआरआर'मधील अभिनय आणि अॅक्शनमुळं लक्षवेधी ठरलेला ज्युनियर एनटीआर आहे. त्यामुळे एका भव्य निर्मितीला चालना मिळाली आहे.
प्रशांत नील दिग्दर्शित हा आगामी चित्रपट ज्युनियर एनटीआरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या चित्रपटात तो 'आरआरआर' नंतरच्या पहिल्या मोठ्या प्रकल्पात दिसणार आहे. या चित्रपटाचं हैदराबादमध्ये शूटिंग सुरू झालं असून ९ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचं उद्धीष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटाची निर्मिती मिथ्री मूव्ही मेकर्स आणि एनटीआर आर्ट्स यांनी केली आहे. या शिवाय ज्युनियर एनटीआर आगामी 'वॉर २' या चित्रपटात हृतिक रोशनबरोबर काम करत असून हा त्याच्या बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट असणार आहे.
हेही वाचा -