मुंबई- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद यांचे नाते जुनेच. गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलनाशी संबंधित वाद दरवर्षी झालेत. यावेळी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे झालेले साहित्य संमेलन अपवाद ठरेल, असे वाटले होते. मात्र, शिवसेनेच्या नेत्या (एकनाथ शिंदे गट) नीलम गोऱ्हे यांनी एक राजकीय वक्तव्य केले आणि त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठले. संमेलनात झालेल्या "असे घडलो आम्ही" या चर्चासत्रात त्या म्हणाल्या होत्या की, ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, नेत्यांची दखल घेतली जायची नाही. नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी आता त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून, त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचाही इशारा दिलाय. दोन्ही शिवसेनेमध्ये पेटलेल्या या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलीय. प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले. त्याचवेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला जबाबदार असल्याची टीका केली होती, त्यास पवार यांनीही उत्तर दिले. तर दुसरीकडे मर्सिडिजवरून सुरू झालेल्या या वादावरून दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांवर तुटून पडलेत.
गद्दारी करून गेलेल्यांवर मी काही बोलणार नाही : नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर कोणी किती मर्सिडिज दिल्या, कोणाकडे किती मर्सिडिज आहेत, यावरून दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. काही नेते एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत, तर काहींनी सावध प्रतिक्रिया दिलीय. गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गद्दारी करून गेलेल्यांवर मी काही बोलणार नाही. मात्र, महिला आघाडीचा विरोध असतानाही आम्ही त्यांना चार वेळा आमदार केले, उपसभापती केले. त्यांनी आम्हाला 8 मर्सिडिज दिल्या का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला होता.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दरी निर्माण झाली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा पाळायला हव्या. त्याचवेळी राजकारणी हे आमच्या व्यासपीठावर येऊ नये, असे साहित्यिकांना वारंवार वाटते किंवा तशा प्रकारचे त्यांचे नेहमी वक्तव्य असते. त्यांनीदेखील पार्टीलाईनवर मत व्यक्त करणे योग्य नाही, त्यांनीही मर्यादा पाळाव्यात. ठाकरेंच्या पक्षात त्या होत्या, मी नव्हतो. त्या पक्षात काय चालत होते, हे त्याच सांगू शकतात, असे म्हणत मर्सिडिजवरून सुरू असलेल्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी थेट बोलणे टाळले.
शरद पवारांचे राऊत यांना उत्तर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर भूमिका मांडली. ते म्हणाले, नीलम गोऱ्हे यांनी त्या ठिकाणी असे वक्तव्य करणे बरोबर आहे का हा प्रश्न आहे. हा स्वत:चा अनुभव नसेल तर त्यांनी केलेले भाष्य योग्य नाही. त्यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. त्यांना 4 टर्म कशा मिळाल्या हे सर्वांना माहिती आहे, असे पवार म्हणाले, तर राऊत जे म्हणतात, ते योग्य आहे. मी स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे राऊत यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी तक्रार नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय आरोप मला मान्य नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केलंय.
सुषमा अंधारे यांचा इशारा : साहित्य संमेलनातील कार्यक्रमात नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या की, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते, तोपर्यंत सर्वकाही ठीक होते. त्यांचे सगळीकडे लक्ष होते. त्यानंतर परिस्थिती बदलली. दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळते, ही ठाकरेंच्या शिवसेनेतील वस्तुस्थिती आहे." ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर गोऱ्हे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी केलीय. 2017 ते 2022 या कालावधीत गोऱ्हे यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही. त्यांनी त्यांचे म्हणणे सिद्ध करावे, न्यायालयात सिद्ध करावे. अन्यथा नाक घासून माफी मागावी, असे अंधारे म्हणाल्या.
शिवसेनाप्रमुख असताना माझ्यासारखा कार्यकर्ता पैशांविना आमदार झाला : "शिवसेनाप्रमुख असताना परिस्थिती वेगळी होती, आता त्यांची 'लेना बँक' झाली आहे, त्यांना देना बॅंक माहित नाही," असा टोला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला. "पूर्वी असे होत नव्हते, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकिट दिले जात असे. पक्षाचे तिकीट पक्षाचे काम करणाऱ्यांना दिले जात असे. ही कार्यकर्त्यांना एक संधी असते. परंतु या लोकांनी ठरवून तिकीटे विकली. माझ्या मतदारसंघात चार जणांना अशाच प्रकारे तिकीटे देण्यात आली. ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, ती मंडळी काल आली व आज पळूनही गेली," असा आरोप शिरसाट यांनी केला.
अनावश्यक वक्तव्य करणे चुकीचे - काँग्रेस : "दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनावश्यक वक्तव्य करणे चुकीचे आहे, परंपरेला न शोभणारे आहे," असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
विनायक पांडेंचे गोऱ्हे यांच्यावर आरोप : 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आमदारकीची उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते, असा खळबळजनक आरोप नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केलाय. मात्र पैसे दिल्यानंतरही मला उमेदवारी मिळाली नाही, असंही पांडे यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये त्यांनी एका पत्रकार परिषदेत हे आरोप केले. संजय राऊत यांनीही मुंबईमध्ये बोलताना पांडे यांचा उल्लेख केला होता.
शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू : एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू झालाय. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलंय. याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले, एका क्षणासाठी असे वाटू शकते, मात्र यामुळे लगेच शिंदे वेगळा निर्णय घेतील, असे समजण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू झालंय किंवा शिंदे वेगळा निर्णय घेतील, असे समजणे सध्या अयोग्य ठरेल आणि जर तसे असले तरी त्याला एकनाथ शिंदे फारसे काही करू शकणार नाहीत, असे सध्या वाटतंय, असंही जयंत माईणकर म्हणालेत.
हेही वाचा -