नवी दिल्ली - विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने आज (बुधवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेत शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी राजा, सीपीएम पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. कृषी कायदे रद्द करण्याचे निर्देश राष्ट्रपतींनी सरकारला द्यावे, अशी विनंती सर्व नेत्यांनी राष्ट्रपतींकडे केली.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधून माहिती दिली. आम्ही राष्ट्रपतींनी प्रस्ताव दिला. कृषी कायदे आणि वीज दुरुस्ती विधेयक रद्द करावेत, अशी मागणी आम्ही केली आहे. हे कायदे लोकशाही विरोधी असून शेतकऱ्यांशी चर्चा न करता मंजूर करण्यात आले आहेत, असे सीपीएम पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काय म्हणाले शरद पवार ?
'अशा थंडीत शेतकरी रस्त्यांवर शांततेत आंदोलन करत आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात ते नाराजी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे हे सरकारचे कर्तव्य आहे'.
कृषी कायद्यांवर सविस्तर आणि खोलात चर्चा करण्याची विनंती सर्व विरोधी पक्षांनी केली होती. हे कायदे संसदीय समितीकडे पाठविण्यात यावेत, अशी मागणी होती, मात्र, दुर्देवाने कोणतीही सुचना मान्य करण्यात आली नाही आणि घाईघाईत कायदे पास करण्यात आले, असे राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार म्हणाले.