कर्नाटक :पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ( Engineering Student Gets 5 Year Jail ) सुनावली आहे. बंगळुरुमधील विशेष न्यायालयाने हा निर्णय़ दिला असून, १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सेंट्रल क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, फैज राशीद हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ( Engineering Student ) आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर त्याने फेसबुक पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला होता. तपासाचा भाग म्हणून फॉरेन्सिकडून मोबाईलची तपासणी करण्यात आली होती. पोलिसांनी विविध कलमांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याला अटक करण्यात आली. फेब्रुवारी २०१९ पासून राशीद कारागृहात आहे. त्याची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती. या प्रकरणात अनेक पोलीस कर्मचारीच साक्षीदार होते.
अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायाधीश (राष्ट्रीय तपास संस्थेशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश) गंगाधर सीएम यांनी हा आदेश दिला. फैज रशीद 2019 मध्ये विद्यार्थी होता आणि तेव्हा तो 19 वर्षांचा होता. सुमारे साडेतीन वर्षांपासून तो कोठडीत आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 153-अ अंतर्गत गुन्ह्यासाठी त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. दुसरीकडे, भारतीय दंड संहितेच्या कलम 201 अन्वये त्याला तीन वर्षांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 13 अंतर्गत रशीदला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा करताना रशीदने लष्कराची खिल्ली उडवली होती आणि विविध माध्यमांच्या पोस्टवर 23 कमेंट्स केल्या होत्या. रशीदच्या वकिलांनी युक्तिवाद केला की तो 21 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे आणि त्याने इतर कोणताही गुन्हा केलेला नाही. त्याला प्रोबेशनवर सोडण्यात यावे. मात्र, न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावत शिक्षा सुनावली. रशीद हा गुन्हा घडवण्याच्या वेळी 19 वर्षांचा असल्याने त्याला प्रोबेशनचा अधिकार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. रशीदने हे जाणूनबुजून केले.