'मेरे साथ डान्स करोगे क्या...' म्हणणाऱ्या परिचारिकांना कारणे दाखवा नोटीस - जिल्हा वैद्यकीय अधिकारी
रुग्णालय प्रशासनाने टिक-टॉक प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेताना परिचारिकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
भुवनेश्वर - मलकानगिरी येथील जिल्हा रुग्णालयातील ४ परिचारिकांनी रुग्णालयातच मजेशीर टिक-टॉक व्हिडिओ बनवला होते. त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यात सर्व परिचारिका गणवेशात आहेत. त्या नाचत आहेत, गात आहेत. वेगवेगळ्या पोझ देताना दिसत होत्या. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेताना परिचारिकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
जिल्हा वैद्यकीय अधिकारी अजित कुमार मोहंती यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की मी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना याबाबत कळवले आहे. परिचारिकांना ४८ तासांत नोटीसचे उत्तर देण्यात सांगण्यात आले आहे. वैद्यकीय विभाग त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करणार आहे.
ओडिशाचे आरोग्यमंत्री नबाकिशोर यावर बोलताना म्हणाले, मी घटनेची चौकशीचा अहवाल विभागाकडून मागवला आहे. त्यांच्याकडून घटनेची तत्थे मागवली आहेत. त्यांनी चौकशीचा अहवाल पाठवल्यानंतर मी कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल.
टिक-टॉक व्हिडिओ बनवताना परिचारिका 'ऑन ड्युटी' होत्या. यातील एक व्हिडिओ सिक अॅन्ड न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये बनवण्यात आला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक वाजत असताना या परिचारिका नाचताना लहान बाळाला खेळवताना दिसत आहेत. तसेच, यावेळी पंजाबी गाणी आणि काही प्रसिद्ध हिंदी गाण्यावरतीही परिचारिकांनी टिक-टॉक व्हिडिओ बनवला होता.