भारतीय राजकारणातील 'अरूण'अस्त'...भाजपचा 'अर्थ' हरपला.. - अरूण जेटली हे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत
संसदीय राजकारणाच्या प्रदीर्घ प्रवासात आपल्या आक्रमक व प्रवाही भाषणाने आणि वेगळ्या कार्यशैलीने विरोधकांसह स्वपक्षीयांवरही छाप पाडणारे अरूण जेटली हे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत नेतृत्व होते.

नवी दिल्ली - अरूण जेटली यांनी भारतीय राजकारणातील अनेक चढउतार पाहिले...अरूण जेटली म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एक हसतमुख आणि अश्वासक चेहरा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएप्रणीत भाजप सरकारच्या पहिल्या सरकारमध्ये जेटली हे केंद्रात अर्थमंत्री होते.
अरुण जेटली यांचे व्यक्तिगत जीवन आणि राजकीय कारकिर्दीवर टाकलेली ही एक धावती नजर...
अरुण जेटली यांचे शिक्षण
किशन जेटली आणि रतन प्रभा जेटली या दाम्पत्याच्या पोटी अरुण जेटली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील निष्णात वकील होते. नवी दिल्ली येथील सेंट जेवियर्स स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. 1973 मध्ये त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, नवी दिल्ली येथून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली, तर 1977 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक कार्यात रस असलेले जेटली 1974 मध्ये दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही राहले आहेत.
अरुण जेटली यांचे कौटुंबिक जीवन
अरुण जेटली यांनी 24 मे 1982 रोजी संगीता जेटली यांच्याशी विवाह केला. त्यांना मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली अशी दोन मुले आहेत.
अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास
अरुण जेटली यांना सुरुवातीपासूनच राजकारणात रस राहिला होता. 1991 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाशी स्वत:ला जोडून घेतले.
- 1999 मध्ये त्यांच्यावर भाजप पक्ष प्रवक्ता पदाची जबाबदारी आली.
- 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये जेटली यांनी 13 ऑक्टोबर 1999 मध्ये माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार हाती घेतला. त्यांच्याकडे गुंतवणूक राज्यमंत्री पदाचा कार्यभारही होता.
- वाजपेयी मंत्रिमंडळातील मंत्री राम जेठमलानी यांनी 23 जुलै 2000 मध्ये आपल्या कायदा आणि न्याय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेटली यांनी कायदा, न्याय आणि कंपनी प्रकरणांचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला.
- जेटली यांनी नोव्हेंबर 2000 मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतली.
- 2004 मध्ये अरुण जेटली यांच्याकडे भाजपच्या महासचिव पदाची जबाबदारी आली.
- 3 जून 2009 रोजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अरुण जेटली यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली. विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यसभेत त्यांची कामगिरी चांगली राहीली. त्यांनी अनेक विधेयकांवर महत्त्वपूर्ण भाषणे केली.
- 2012 साली जेटली यांनी रामलीला मैदानावर झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे जोरदार समर्थनही केले.
"अरुण जेटली यांनी 2014 पर्यंत लोकसभेची थेट निवडणूक कधीच लढवली नाही पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढलेल्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केली. मात्र, या निवडणुकीतही त्यांचा काँग्रेस उमेदवार अमरिंदर सिंह यांच्याकडून पराभूत झाला."
- पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांनी 26 मे 2014 मध्ये त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली.
केंद्रीय मंत्रीपदाची कारकिर्द
अरुण जेटली यांची केंद्रीय अर्थमंत्री म्हणून संमिश्र कामगिरी राहिली. नोटबंदी, जीएसटी हे त्यांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्वात मोठे निर्णय ठरले.
राजकारणातून सन्यास..
अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए 1 सरकारमध्ये केंद्रात अर्थमंत्री होते. मात्र, मागील काही काळ ते सतत आजारी असल्याने त्यांनी स्वत:हूनच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आपण प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होत नसल्याचे म्हटले होते. "पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले पत्र जेटली यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केले होते. या पत्रात 'गेल्या 18 महिन्यांपासून माजी प्रकृती ठिक नाही. गेल्या काही काळात ती अधीकच बिघडली आहे. आपण निवडणूक प्रचार काळात केदारनाथ जाण्यासाठी निघाले होतात तेव्हाच मी आपल्याला माझ्या प्रकृतीसंबंधी माहिती दिली होती. त्यामुळे मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करावे. जेणेकरुन मी माझ्या आरोग्याकडे अधिक चांगले लक्ष देऊ शकेल." असे जेटली यांनी म्हटले होते.