अमेरिकेचे कौन्सिल जनरल माईक हँकी साई चरणी लिन, बाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन - US Consul General Mike Hankey - US CONSUL GENERAL MIKE HANKEY
Published : Jul 20, 2024, 10:10 PM IST
शिर्डी (अहमदनगर) US Consul General Mike Hankey : अमेरिकन कौन्सिल जनरल माईक हँकी यांनी आज (20 जुलै) शिर्डीत येऊन साई मंदिरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. हँकी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या मध्यान्ह आरतीलाही उपस्थिती लावलीय. साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी त्यांना साई मूर्ती, शॉल देऊन सत्कार केला.
30 वर्षांपासून साईबाबांचा भक्त : साई दर्शनानंतर माईक हँकी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, मी गेल्या 30 वर्षांपासून साईबाबांचा भक्त आहे; मात्र शिर्डीला येण्याची संधी मिळाली नाही. आज पहिल्यांदाच मी शिर्डीला पोहोचलो आणि बाबांचं दर्शन घेतलं. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र साईबाबांनी जगाच्या कल्याणासाठी दिलाय. अशाच विचारांची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्व जाती-धर्माचे लोक साईबाबांना आपला देव मानतात. आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आलो आहे. मनाला खूप समाधान, खूप शांती मिळाली असल्याचंही माईक हॅंकी म्हणाले आहे.