उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीजया चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया; अशोक चव्हाणांनी मानले आभार - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Oct 20, 2024, 10:51 PM IST
नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नांदेडमधून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचं लक्ष लागलेल्या भोकर मतदार संघातून भाजपानं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीजया चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. भोकर मतदार संघातील जनतेची सेवा करण्याचं काम मिळालं आहे. प्रामाणिक मी त्यांच्या सर्व अडचणी दूर करणार असल्याचं श्रीजया चव्हाण म्हणाल्या. निवडणुकीत कोणी ना कोणी विरोधात उभे राहतात, पण त्यांची काळजी घेण्यासाठी माझे वडील आहेत, असं देखील त्या म्हणाल्या. ५० वर्षा पासूनचव्हाण कुटुंब जनतेची सेवा करत आहे, तीच सेवा करण्याचं भाग्य मला मिळाल्याचं श्रीजया चव्हाण म्हणाल्या. उमेदवारी दिल्याने श्रीजया चव्हाण यांनी भाजपा नेत्यांचे आभार मानले.
खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपा नेतृत्वाचे आभार मानले आहेत. पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण आणि त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी आपल्या भावना मांडल्या. मी सत्तेवर असताना कधीही जातीय समीकरण लक्षात ठेऊन काम केलं नाही. पुढं देखील विकास कमांच्या बाबतीत कधीही जात म्हणून बघणार नाही. आजही माझ्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि श्रीजयासोबत देखील राहतील, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.