महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शिवरायांचा जयजयकार करून आग्र्यातील मराठी बांधवांनी साजरी केली शिवजयंती - Shiv Jayanti Agra

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 5:51 PM IST

छत्रपती संभाजीनगर/ आग्रा: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र तसाच उत्साह आग्रा येथील लाल किल्ल्यासमोर पाहायला मिळाला. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आग्रा येथे स्थित असलेल्या महाराष्ट्रातील बांधवांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. वेगवेगळ्या पद्धतीचे सोहळे साजरे करत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून या सोहळ्याला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत महाराष्ट्रीय बांधव या कार्यक्रमात उपस्थित झाले होते.

आग्र्याच्या किल्ल्यासमोर सोहळा: आग्रा येथील लाल किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून पोवाडे सादर करण्यात आले. महाराष्ट्रीय बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत महाराजांच्या नावाचा जयघोष करत उत्सवाला सुरुवात केली. छत्रपतींच्या पुतळ्याला अभिषेक करून पुष्पवृष्टी करत यावेळी महाराजांची आरती करण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने हार घालण्यासाठी क्रेन उपलब्ध करून दिल्यानं आलेल्या पाहुण्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. हातात भगवा झेंडा, अंगावर महाराजांचा फोटो असलेले शर्ट आणि महिलांनी परिधान केलेल्या पारंपरिक वेशभूषा यामुळे सोहळ्याला वेगळी रंगत पाहायला मिळाली. लहान मुलं, महिला, युवक, वृद्ध सर्वच महाराष्ट्रीयन बांधवांनी या सोहळ्यात आनंदानं आणि उत्साहात सहभाग नोंदवला. त्यामुळे लाल किल्ल्यासमोर महाराष्ट्रमय वातावरण पाहायला मिळालं.

आग्र्यात राहतात महाराष्ट्रीय कुटुंबीय: आग्रा येथे मराठी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. काही लोक नोकरीसाठी तर काही व्यवसायानिमित्त उत्तर प्रदेशात राहतात. आग्र्यामध्ये साधारणतः तीस हजार मराठी भाषिक राहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यापैकी बहुसंख्य लोक सोन्या-चांदीचे दागिने घडवण्याचे काम करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details