राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक; पक्षाचे फाडले बॅनर - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Oct 27, 2024, 10:20 PM IST
बीड : शरद पवारांनी परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करताच, इच्छुक आणि संभाव्य उमेदवार राजेभाऊ फड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजाभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवारांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघातून राजेभाऊ फड हे इच्छुक आणि संभाव्य उमेदवार होते. त्यामुळं त्यांनी तशी तयारी देखील केली होती. मागील पंधरा दिवसांपासून ते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. मात्र आज शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख हे मराठा कार्ड देऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान राजेभाऊ फड यांनी उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करेल असं सांगितलं होतं. मात्र, फड यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळं या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ झाला आहे.