नांदेड - मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेलं नांदेड शहर गुन्हेगाराच्या हत्येनं (Nanded crime news) हादरलं आहे. या प्रकरणात थेट पाकिस्तानस्थित असलेल्या दहशतवाद्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगार गुरमितसिंग सेवादार आणि त्याचा मित्र रविंद्र सिंग राठोड शहीदपुरा भागात सोमवारी सकाळी आले होते. तेव्हा अज्ञात आरोपीनं दुचाकीवरून येवून दोघांवर बेछूट गोळीबार केला. अज्ञात आरोपीनं आठ ते दहा गोळ्या झाडल्याची माहिती आहे. एक गोळी तिथे उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचेवर लागून दुसऱ्या बाजूनं दरवाजा चिरत गेली.
हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद- दोन्ही जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असताना रवींद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाला. सेवादास यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. संशयित हल्लेखोर गोळीबार करून दुचाकीवरून भरधाव वेगात पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून तपास सुरू- घटनेच्या माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून प्रत्यक्ष पाहणी केली. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला. पोलिसांकडून एलसीबीची टीम, डीपी पथक वजीराबाद पोलीस ठाणे पथक आणि सायबर टीम आरोपींचा शोध घेत आह. गुन्हा घडताच शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी लावण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या माहितीनुसार गोळीबारामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले, " हल्लेखोराचा हेतू काय होताय़ हल्लेखोर कोण होते? याचा तपास सुरू आहे. वजिराबाद, शिवाजी नगर, इतवारा, विमानतळ, एलसीबी, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी हल्लेखोराचा शोध घेत आहेत."
हल्ल्यामागे रिंडाचा हात- हल्ल्यामागं पाकिस्तानस्थित फरार दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंडाचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार जखमी गुरमीत सिंग हा हल्लेखोरांचा मुख्य लक्ष्य असावा. कारण, तो २०१६ मध्ये रिंडाचा भाऊ सुरिंदर सिंगच्या हत्येत सहभागी होता. त्या प्रकरणात गुरुमितसिंगला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो 30 दिवसांच्या पॅरोलवर (रजेवर) २२ जानेवारी तुरुंगातून बाहेर आला होता. त्यामुळे बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (बीकेआय) स्वयंघोषित भारत प्रमुख रिंदा यानंच त्याच्या हत्येसाठी शार्पशुटरचा उपयोग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कोण आहे दहशतवादी रिंडा- रिंडा हा मूळचा पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील आहे. तो ११ वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबासह महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थलांतरित झाला.राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) केलेल्या तपासात रिंडा आणि त्याच्या सहकाऱ्यांची पंजाब आणि देशाच्या इतर भागांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कट रचल्याचं निष्पन्न झालं. रिंडावर एनआयएनं १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवलं आहे. सुरक्षा यंत्रणांच्या मते, रिंडा सध्या पाकिस्तानातील लाहोरमध्ये आहे. तेथून तो सीमापार दहशतवादी हल्ले आणि खंडणी वसुलीचे गुन्हे करतो. खंडणीसाठी त्यानं स्थानिक टोळी तयार केली आहे. खंडणीसाठी रिंडानं नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणीची हत्या केल्याचा आरोप आहे.