"आमच्यातला देवमाणूस हरवला", कामगार युनियनमधील कर्मचाऱ्यांनी दिला रतन टाटांच्या आठवणींना उजाळा - RATAN TATA
Published : Oct 10, 2024, 12:52 PM IST
पुणे : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. ते भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय उद्योगपती होते. ते केवळ उद्योगातील योगदानासाठीच नव्हे तर त्यांच्या परोपकारासाठी आणि दानशूरपणासाठी देखील ओळखले जायचे. रतन टाटा यांच्या निधनानंतर पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील टाटा समुहात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांची त्यांचं अंत्यदर्शन घेण्याची इच्छा आहे. मात्र, काम कधीही बंद पडू नये, अशी रतन टाटा यांची इच्छा होती. त्यामुळं कंपनी सुरू ठेवून कंपनीतील युनियनमधील पदाधिकारी हे मुंबईकडं निघाले आहेत. यावेळी टाटा मोटर्स कंपनी युनियन मधील कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "जेव्हा-जेव्हा साहेब पुणे येथील प्लांटला भेट देत होते. तेव्हा त्यांना कामगाराबाबत नेहमी आपुलकी वाटायची. ते कामगारांवर प्रेम करायचे. आज आमच्या सर्व कामगारांवर दुःखाचं सावट निर्माण झालंय."