माढा लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत तणाव, रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिला 'हा' इशारा - रामराजे नाईक निंबाळकर
Published : Feb 3, 2024, 1:37 PM IST
सातारा Madha Lok Sabha: माढा लोकसभा मतदार संघात सध्या महायुतीत घमासान पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल करत ते अत्यंत अहंकारी, गर्विष्ठ असल्याचं म्हटलंय. तसेच संजीवराजे नाईक-निंबाळकरांना उमेदवारी डावलली तर विद्यमान खासदारांनाही उमेदवारी मिळू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. काही लोक नरेंद्र मोदींच्या आणि भाजपाच्या नावावर मते घेतात. परंतु, त्यांचं स्वत:चं कर्तृत्व शून्य आहे. एक सांगलीच्या तुरुंगातून बाहेर येऊन आमदार झाला आणि दुसरा फलटणच्या बाहेर माहीत नसलेला दिल्ली बघायला गेला. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशा शब्दांत रामराजे नाईक-निंबाळकरांनी आमदार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा समाचार घेतला.