पुणेकरांवर 'झिका'चं संकट; शहरात एकूण 66 रुग्ण, त्यात 26 गर्भवती महिला - Zika Virus Pune - ZIKA VIRUS PUNE
Published : Aug 6, 2024, 7:07 PM IST
पुणे Zika Virus Patients in Pune : पुणे शहरात मागील महिन्याभरापासून झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 66 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 26 गरोदर महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. याबाबत महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, "पुणे शहरात आत्तापर्यंत एकूण 66 झिकाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 26 गरोदर महिला आहेत. त्यामुळं ज्या भागातून रुग्ण आढळून आलेत. तेथे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येतय. तसंच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे." पुढं ते म्हणाले, "झिका व्हायरसपासून बचावासाठी नागरिकांनी संपूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घालावेत, फ्रिज, कूलर, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. तसंच ज्यांमध्ये झिका व्हायरसची लक्षणं आढळून आलीत त्यांनी तत्काळ महानगरपालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा".