पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने; नेमकं कारण काय? - धीरज घाटे
Published : Feb 9, 2024, 8:54 PM IST
पुणे Pune News : पुण्यात दांडेकर पूल भागातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात आज (9 फेब्रुवारी) 'निर्भय बनो' या सभेचे आयोजन करण्यात आल होतं. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार निखिल वागळे हे उपस्थित राहणार होते. मात्र, काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळं भाजपाकडून निखिल वागळे यांच्या कार्यक्रमाला जोरदार विरोध झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या कार्यक्रमाचं समर्थन करण्यात येत होतं. यावरुन आज राष्ट्रसेवा दलाच्या बाहेर महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आले. निखिल वागळे यांनी मोदी आणि अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याची भूमिका भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी घेत राष्ट्रसेवा समोर आंदोलन केलं. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, इतकी दक्षता घेऊनही कार्यक्रमाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळालं.