प्रचारात दुसर्याला वाईट शब्दांत लेखणे चुकीचे- सयाजी शिंदे
Published : Nov 12, 2024, 8:06 AM IST
शिर्डी (अहिल्यानगर)- "प्रचारात महिलांबद्दल कोणीही अपशब्द वापरायला नको. राज्याच्या भल्यासाठी आपण कोणत्या योजना घेऊन येणार? कोणते विकासकामे आपण करणार आहे? यावर बोलायला पाहिजे. दुसर्याला वाईट शब्दांत कमी लेखणे चुकीचे आहे," असे परखड मत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं. अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता.११) आंबीखालसा ( ता.संगमनेर) येथील श्री लक्ष्मी मंगल कार्यालयात सोमवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सिताराम गायकर, जालिंदर वाकचौरे, कपिल पवार यांच्यासह आदी उपस्थित होते. तेलुगू चित्रपटातून आपली एक वेगळी छबी उमटवणारे सयाजी शिंदे यांनी यावेळी तेलुगू भाषेतून डायलॉग म्हटला. "तुझे लिंबू खरे असेल तर माझे नारळही खरं आहे. तुझे भूत खरे असेल तर माझा देवही खरा आहे," असा शब्दांत महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. किरण लहामटे यांचे कौतुक केले.