कळव्यात भीषण आग : स्क्रॅप गाड्या आणि भंगाराला आग लागल्यानं परिसरात हाहाकार - कळव्यात भीषण आग
Published : Mar 7, 2024, 10:25 AM IST
ठाणे Thane Fire : कळवा इथल्या खारेगाव परिसरात साठवून ठेवलेल्या हजारो स्क्रॅप गाडयांना अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या आगीनं काही क्षणातंच रौद्ररूप धारण केल्यानं नागरिकांची मोठी धावपळ झाली आहे. या ठिकाणी वर्षानुवर्षे ठेवलेल्या गाड्या आणि भंगार पेटलं आहे. सर्व नियम धाब्यावर बसवत बाहेरून पत्रे लावून हे बेकायदेशीर स्क्रॅपयार्ड बनवण्यात आलं होतं. अनेक गुन्ह्यात पकडलेली वाहनं उचलून आणून इथं ठेवली जात होती. कालांतरानं या गाड्या सडून गेल्या होत्या. त्यांची विल्हेवाट नं लावता या गाड्या इथं ठेऊन दिल्यानंच ही घटना घडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या आगीचं वृत्त कळताच ठाणे आणि कळवा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. डझनभर आगीचे बंब आणि पाण्याच्या टँकरच्या सहाय्यानं अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परंतु तोपर्यंत हजारो गाड्या आगीत जळून भस्मसात झाल्या. आगीच्या नक्की कारणांची अद्याप तरी माहिती नसून त्याचा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.