मराठी माणसावरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद; पाहा कोण काय म्हणालं? - MARATHI FAMILY BEATEN IN KALYAN
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 20, 2024, 1:59 PM IST
नागपूर : कल्याणमधील अजमेरा हाईट्स योगीधाम इमारतीत धूप लावण्यावरून झालेल्या वादातून मंत्रालयातील अधिकारी अखिलेश शुक्लानं गुंडांना बोलावून मराठी माणसांना मारहाण केली. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले असून विविध पक्षांच्या नेत्यांनी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले,"विषमता ही किती दूर दूर पर्यंत पसरलेली असते आणि कशी ती तुमच्यापर्यंत पोहोचते हे आता लक्षात घ्या. मी जेव्हा बोलत होतो. तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची. आपण लोकांना घरं नाकारली. आता ते आपल्याला नाकारत आहेत." तसंच यावरुन शिवसेना (उबाठा) आमदार वरुण सरदेसाई म्हणाले, "मी माझ्या सभागृहाच्या पहिल्याच भाषणामध्ये हा मुद्दा घेतला होता. जेव्हापासून भाजपाचं सरकार आलंय, तेव्हापासून अमराठी लोकांची मराठी लोकांवरील दादागिरी वाढली आहे. हे सर्व लोक मराठी माणसांचा आवाज दाबण्यासाठी आता थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करु लागलेत. पण काहीही झालं तरी शिवसेना (उबाठा) पक्ष कायम मराठी माणसाच्या सोबत उभा राहीन. अखिलेश असो किंवा दुसरं कोणीही असो या सर्वांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही", असा इशाराही त्यांनी दिला. तर "जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे. स्वत:च्या घरात कोणी काय खायचं हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं नक्कीच अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे", असं भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.