'मिनी काश्मीरा'त बिबट्याचा मुक्त संचार, ऐन थंडीत पर्यटकांना फुटला घाम, पाहा व्हिडिओ - LEOPARD IN MAHABALESHWAR
Published : Nov 29, 2024, 11:12 AM IST
सातारा : जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर' गारठलं आहे. महाबळेश्वरचा (Mahabaleshwar) पारा 12 अंशापेक्षाही खाली आला आहे. हिवाळ्यात महाबळेश्वरच्या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची महाबळेश्वरात गर्दी वाढू लागली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीत पर्यटकांना घाम फोडणारी घटना घडली आहे. नुकताच महाड नाक्यावर एका बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मुख्य रस्त्यावरुन ऐटीत चालत निघालेल्या बिबट्याचं एका व्यावसायिकानं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात व्हिडिओ चित्रीकरण केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून पर्यटकांना ऐन थंडीत घाम फुटला आहे. ख्रिसमसच्या सुट्टीमुळं पुढील पंधरा दिवसांत महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर' पर्यटकांनी गजबजणार आहे. परंतु, महाबळेश्वर परिसरात नर-मादी बिबट्या आणि दोन बछड्यांचा वावर असल्यानं पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.