उद्धव ठाकरेंना 'मनसे' प्रत्युत्तर देणारे पोलिसांच्या रडारवर, अविनाश जाधवसह 53 मनसैनिकांवर गुन्हे दाखल - Avinash Jadhav
Published : Aug 11, 2024, 10:38 PM IST
ठाणे Avinash Jadhav : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना 'मनसे'नं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांच्या ताफ्यावर शेण,नारळ फेकल्याप्रकरणी मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह 9 जणांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. गडकरी रंगायतनमध्ये राडा करणाऱ्या 44 मनसैनिकांवर वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 32 महिला कार्यकर्त्या तसंच 12 पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात केली असून मनसेच्या बंद कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. "पुन्हा आमच्या पक्ष प्रमुखांबद्दल ब्र काढाल, तर मातोश्रीमध्ये घुसू," असा गर्भित इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. ठाणे आणि पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. सर्वांवर कलम 61 (2) 125, 189(2) 49, 190, 131(2), 324 (4) पोलीस अधिनियम 1951चं कलम 37 पोट कलम (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.