हैदराबादYEARENDER 2024 : 2024 या वर्षात भारतात सायबर फसवणुकीची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. या वर्षी ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धती पूर्वीपेक्षा अधिक डिजिटल झाल्या आहेत. उदाहरणार्थ, क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदना यांच्या नावाचे डीप फेक व्हीडिओ तयार करण्यात आले होते.
बनावट FedEx कुरिअर घोटाळ्यासारखे घोटाळेही पाहायला मिळाले. बनावट गुंतवणूक, सायबर ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांमुळेही लोकांचे मोठं आर्थिक नुकसान झालं. याशिवाय एका 75 वर्षीय व्यक्तीची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या अहवालानुसार 1 जानेवारी ते 11 नोव्हेंबर या कालावधीत 14 लाख सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 2024 मध्ये घडलेल्या अशाच काही ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल या बातमीतून सविस्तर माहिती जाणून घऊया....
बनावट व्हिडिओ जाहिरात : जानेवारी 2024 मध्ये, अनुभवी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ देखील तयार करण्यात आला होता. सचिनच्या या बनावट व्हिडिओमध्ये तो स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट या गेमची जाहिरात करताना दाखवण्यात आला होता, मात्र हा व्हिडीओ खोटा होता. हा व्हिडीओ खोटा असल्याची माहिती सचिननं स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दिली होती. याविरोधात सचिननं सोशल मीडियावर कारवाईचे आवाहनही केलं होतं. त्यांच्याशिवाय विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचंही डीप फेक व्हिडिओ बनवले होते. यावरून डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर खूप वेगानं वाढत असल्याचं दिसून येतंय. यामुळे लोकांची प्रतिमा तर डागाळत आहेच, पण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होत आहे.
बनावट FedEx कुरिअर घोटाळा :फेब्रुवारी 2024 मध्ये, बेंगळुरूमधील एका आयटी कंपनीच्या सीईओला मुंबईतील FedEx कुरिअर एजंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकाचा कॉल आला होता. त्याच्या नावावर बेकायदेशीर पार्सल असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला पोलीस असल्याची बतवणी करून दुसऱ्या व्यक्तीशी बोलण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी त्यांन गुन्हा दाखल केल्याचं संबंधिताला सांगितलं. या कालावधीत सीईओंना आठ व्यवहारांद्वारे एकूण 2.3 कोटी रुपये पाठवण्याची सक्ती करण्यात आली. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि हा घोटाळा उघडकीस आला. सायबर गुन्हेगार किती हुशारीनं लोकांना बळी बनवतात हे या घोटाळ्यावरून दिसून येतं.
बनावट गुंतवणूक योजना :जुलै 2024 मध्ये, तेलंगणातील एका 75 वर्षीय निवृत्त व्यवस्थापकाला बनावट गुंतवणूक योजनेचा बळी बनवलं गेलं. व्हॉट्सॲपवर गुंतवणुकीचा प्रस्ताव आला, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आश्वासन दिलं होतं. काही दिवसांतच त्यानं 4 कोटी रुपये गुंतवले आणि त्याच्या खात्यात 10 कोटी रुपये आल्यावर त्याला आणखी पैसे जमा करण्यास सांगण्यात आलं. फसवणुकीच्या या प्रकारात सायबर गुन्हेगार लोकांना जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करून त्यांचे मोठं आर्थिक नुकसान करताय.
सायबर ब्लॅकमेल :ऑगस्ट 2024 मध्ये पुण्यातील 74 वर्षीय व्यक्ती सायबर ब्लॅकमेलचा बळी ठरली. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी त्याला अनेक वेळा फोन करून बँकेत जाऊन 97 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं. हा सायबर गुन्हा करणाऱ्या भामट्यांनी पीडितेला पैसे न दिल्यास कायदेशीर गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी दिली. सायबर ब्लॅकमेलला बळी पडणाऱ्यांवर किती मानसिक आणि आर्थिक दबाव टाकला जातो, हे या फसवणुकीच्या प्रकारावरून दिसून येते.
बनावट ट्रेडिंग ॲप :ऑगस्ट 2024 मध्ये, मुंबईतील 75 वर्षीय निवृत्त जहाज कप्तानला बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे 11.16 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा बळी बनवण्यात आलं. हा घोटाळा एका व्हॉट्सॲप ग्रुपमधून सुरू झाला, ज्यामध्ये ते गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित झाले. नंतर त्यांना त्याच्या फायद्यासाठी अतिरिक्त शुल्क जमा करण्यास सांगण्यात आलं, परंतु जेव्हा निवृत्त जहाज कप्तानने त्याचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला त्याचे पैसे परत मिळाले नाहीत.
बनावट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : ऑगस्ट 2024 मध्ये वर्धमान समूहाचे अध्यक्ष एस. पी. ओसवाल यांनाही फसवणुकीचा बळी बनवण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना बनावट ऑनलाइन न्यायालयीन सुनावणीचे आमिष दाखवलं आणि तपासाचा भाग म्हणून त्यांचे पैसे खात्यात हस्तांतरित करण्यास सांगितले. भीतीपोटी ओसवाल यांनी आपली संपूर्ण रक्कम हस्तांतरित केली. नंतर, त्यांनी प्रकरणाची माहिती दिली तेव्हा, आरोपींना अटक करण्यात आली आणि 5.2 कोटी रुपये जप्त करण्यात आले.