हैदराबाद Why Mobile Phone Charging Slowly :आजकाल बहुतांश लोकांकडं अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत. लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात मोबाईलचा सतत वापर करतात. बाजारात महागडे आणि प्रीमियम स्मार्टफोन उपलब्ध आहेत, जे लोक खरेदी करतात. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या स्मार्टफोन्समध्ये कालांतरानं अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. त्यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे बॅटरीची.
बॅटरी बॅकअप कमी : साधारणपणे तीन ते चार वर्षे स्मार्टफोन वापरला की, त्याचा बॅटरी बॅकअप कमी होतो. यासोबतच अनेक वेळा लोकांना स्मार्टफोनचे चार्जिंग स्लो होण्याची समस्या देखील भेडसावते. जर बॅटरी बॅकअप कमी असेल, तर नवीन बॅटरीनं ही समस्या सोडवता येते, परंतु जर चार्जिंग स्लो असेल तर लोकांना ही समस्या का होत आहे. परिणामी लोकांना सर्व्हिस सेंटर किंवा जवळच्या दुरुस्तीच्या दुकानात जावं लागतं. स्मार्टफोनचं चार्जिंग स्लो का होतं,?त्यामागील काय कारणं आहेत जाणून घेऊया या बातमीतून...
चार्जिंग स्लो का होते? :स्मार्टफोनच्या स्लो चार्जिंगची अनेक कारणं असू शकतात. यापैकी सर्वात सामान्य कारण म्हणजे कमकुवत किंवा खराब झालेले उर्जा स्त्रोत. याशिवाय तुम्ही वायरलेस चार्जिंग केलं तरी चार्जिंग स्लो होते. चार्जिंग पोर्टमध्ये घाण साचणं, हे देखील याचे कारण असू शकतं.
केबल किंवा चार्जर समस्या : स्लो चार्जिंगसाठी सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हजणे कमी दर्जाचं चार्जिंग केबल. कालांतरानं, केबल्स जीर्ण होतात, ज्यामुळं त्यांची कार्यक्षमता कमी होते. तुमच्या डिव्हाइससाठी शिफारस केलेल्या पॉवर आउटपुटची पूर्तता न करणारे चार्जर देखील चार्जिंग प्रक्रिया स्लो करू शकतात.
कमकुवत उर्जा स्त्रोत : लॅपटॉपचा यूएसबी पोर्ट किंवा कमी पॉवर ॲडॉप्टर वापरल्यानं चार्जिंग स्लो होऊ शकते. हे स्रोत वॉल आउटलेट चार्जरच्या तुलनेत कमी उर्जा देतात.