नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2025 चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी अनेक विशेष घोषणा केल्या. अणुऊर्जेच्या क्षेत्रातबाबतही त्यांनी मोठी घोषणा केलीय. लहान मॉड्यूलर रिॲक्टर्सच्या संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी 20,000 कोटी रुपयांच्या बजेटसह अणुऊर्जा अभियानाची घोषणा केलीय. हे भारत सरकारने सुरू केलेले एक नवीन अभियान आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, या मोहिमेअंतर्गत, 2047 पर्यंत किमान 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्माण केली जाईल. तसंच 2033 पर्यंत किमान पाच स्वदेशी लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या कार्यान्वित केल्या जातील.
अणुऊर्जेच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा प्रवेश
संसद भवनात 2025 चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, अणुऊर्जेच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश केला जाईल. लहान मॉड्यूलर रिॲक्टर्सवर (एसएमआर) विशेष लक्ष दिलं जाईल. गेल्या वर्षी सरकारनं 18 नवीन अणुभट्ट्या जोडण्याची घोषणा केली होती, ज्यामुळं 13,800 मेगावॅट वीज निर्माण होईल.
किती असेल ऊर्जा क्षमता?
या छोट्या अणुऊर्जा प्रकल्पांना भारत स्मॉल रिॲक्टर्स (BSR) असं नाव दिलं जाईल. लहान आणि मॉड्यूलर न्यूक्लियर रिॲक्टर हे विशेष आकाराचं न्यूक्लियर रिॲक्टर आहे, ज्यांची एक युनिट निर्मिती क्षमता 300 मेगावॅट असून जी पारंपारिक न्यूक्लियर प्लांटच्या वीज क्षमतेच्या एक तृतीयांश आहे.
कार्बनमुक्त ऊर्जा
अणुऊर्जा प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही उर्जा कार्बनमुक्त असल्याचं म्हटलं जातं. हेवेत कार्बन सोडणाऱ्या कोणत्याही प्रकारचं इंधन यात वापरलं जात नाही. ही उर्जा स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जाचा स्रोत आहे. याशिवाय, थोड्याशा युरेनियमपासून भरपूर ऊर्जा निर्माण करता येते.
हे वाचलंत का :