हैदराबाद : दूरसंचार विभागानं बनावट कॉल आणि मेसेजेसची तक्रार करण्यासाठी संचार साथी मोबाइल ॲप लाँच केलंय. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरसंचार विभागानं आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान हे मोबाइल ॲप लाँच केलं. याशिवाय, केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन 2.0 देखील लाँच केलं आहे, ज्यामध्ये देशातील प्रत्येक गावात फायबर ब्रॉडबँड सेवा दिली जाईल. 2017 मध्ये, मोदी सरकारनं राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनची घोषणा केली होती, ज्याद्वारे देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबर (OFC) प्रदान करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं.
संचार साथी ॲप लाँच
संचार साथी पोर्टलचा देशातील 120 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. मोबाईल वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवरून बनावट कॉल आणि मेसेजेसची तक्रार करू शकतील. सरकारनं 2023 मध्ये संचार साथी पोर्टल सुरू केले होतं. या पोर्टलद्वारे, बनावट कॉल आणि मेसेजेसची तक्रार करण्यासोबतच, हरवलेल्या मोबाईल फोनचा IMEI ब्लॉक करता येतो, तसंच आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर तपासता येतो. वापरकर्त्यांना आता मोबाईल अॅपद्वारे या सर्व सुविधा मिळतील. केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत मोबाईल वापरकर्त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. तसंच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत मोहिमेत तंत्रज्ञानाच्या योगदानामुळं राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन 2.0 द्वारे देशभरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणखी सुधारली जाईल, असं म्हटलंय.