हैदराबाद : प्रोबा 3 उपग्रहामध्ये समस्या आढळून आल्यानंतर इस्रोनं युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) उपग्रहाचं प्रक्षेपण पुढं ढकललं आहे. आता उपग्रहाचं लॉन्चिंग 5 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:12 वाजता होईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रक्षेपण पॅड 1 वरून PSLV-XL रॉकेटनं याचं प्रक्षेपण केलं जाईल. सध्या, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी या दोघांनीही उपग्रहामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची समस्या आहे, ते सांगितलेलं नाही.
सौर मोहीम रिशेड्यूल :इस्रोनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. प्रोबा-3 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलं जाणार होतं, इस्रोच्या मते, युरोपियन स्पेस एजन्सीची ही सौर मोहीम आता गुरुवारी दुपारी 4:12 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आली आहे.
एकूण वजन 550 किलो :या मोहिमेत इस्रो PSLV-C59 रॉकेटची मदत घेत आहे. यामध्ये C59 हा रॉकेट प्रक्षेपणाचा कोड आहे. PSLV रॉकेटचे हे 61 वे आणि PSLV-XL चे 26 वे उड्डाण असेल. हे रॉकेट 145.99 फूट उंच आहे. प्रक्षेपणाच्या वेळी त्याचं वजन 320 टन असेल. हे चार टप्प्याचे रॉकेट आहे. हे रॉकेट प्रोबा 3 उपग्रहाला सुमारे 26 मिनिटांत 600 X 60,530 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत स्थिर करेल. प्रोबा-3 मोहिमेच एक नाही तर दोन उपग्रह सोडले जातील. ज्याचे एकूण वजन 550 किलो असेल. पहिले कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट आणि दुसरे ऑक्युल्टर स्पेसक्राफ्ट.