हैदराबाद cyber fraud case :सायबर फसवणूक प्रकरणात 2.88 कोटी रुपये गमावलेल्या एका वृद्धाला हैदराबाद पोलिसांनी 53 लाख रुपये परत केले. चुकीच्या पद्धतीनं सायबर गुन्हेगारांनी त्यांची फसवणूक केली होती. पीडितेला न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम परत करण्यात आली आहे. हैदराबाद येथील एका ८४ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीनंतर सिटी सायबर क्राईम पोलिसांनी तपास करून ही कारवाई केली होती.
हैदराबादचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी तक्रारदाराशी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला होता. त्यांनी सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून 68 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीत त्याचा सहभाग असल्याचा दावा केला. तसंच तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, अशी धमकीही दिली. यामुळं घाबरलेल्या पीडितेनं फसवणूक करणाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांनी दिलेल्या बँक खात्यात 2.88 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
सायबर क्राइम पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम 66(सी), 66(डी) आणि 308(2), 318(4),319(2), 336(३), 338, 340(3) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून फसवणूक केलेली रक्कम गोठवण्यासाठी त्यांच्याकडं पाठपुरावा केला. फसवणूक झालेल्या खात्यांमध्ये असलेली रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात परत करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
पोलीस आयुक्त म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळं न्यायालयानं बँकांना रक्कम परत करण्याचं आदेश दिले. कोर्टानं ॲक्सिस बँक, सुरतला 53 लाख रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया केरळला 50 लाख रुपये परत करण्याचे निर्देश दिले. बँक अधिकाऱ्यांच्या नियमित पाठपुराव्यावरून आज तक्रारदाराच्या खात्यात 53 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.