हैदराबाद : विश्वात अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक घटना घडत राहतात. वर्षाच्या अखेरीस आकाशात 'ब्लॅक मून' दिसणार असताना आकाश निरीक्षकांना एक रोमांचक घटना अनुभवायला मिळेल. चंद्र तेजस्वी दिसत असला तरी, तुम्ही चंद्र अनेक रंगांमध्ये पाहिला असेल. तो कधीकधी लाल, पिवळा आणि कधीकधी गुलाबी दिसतो, परंतु आता तो चक्क काळा दिसणार आहे.
यूएस नेव्हल ऑब्झर्व्हेटरीनुसार,आकाशात 'ब्लॅक मून'ची ही अनोखी घटना 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:27 वाजता (227 GMT) घडेल. अमेरिकेतील नागरिकांना हा काळा चंद्र 30 डिसेंबर रोजी दिसेल, तर युरोप, आफ्रिका आणि आशियातील नागरिकांना, ही घटना 31 डिसेंबर 2024 रोजी दिसेल. भारतातही, 'ब्लॅक मून' 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:57 वाजता दिसेल.
का होतो चंद्र काळा ? : अमावस्येच्या रात्री सूर्य आणि चंद्र एकाच वेळी समांतर येतात. त्यामुळं चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीपासून दूर जातो, ज्यामुळे तो उघड्या डोळ्यांना पाहता येत नाही. तसंच आकाश काळं दिसतं. चंद्रचक्र सरासरी 29.5 दिवसांचं असल्यानं कधीकधी एका महिन्यात दोन अमावस्या देखील येऊ शकतात, ज्यामुळं ब्लॅक मूनची घटना घडते. ही 'ब्लॅक मून'सारखी एक खगोलीय घटना आहे, जी अत्यंत दुर्मिळ मानली जाते.