छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - Salman Khan :अभिनेता सलमान खान यांच्या घरावर हल्ला प्रकरणात छत्रपती संभाजी नगर येथे त्याचे धागेदोरे सापडले आहेत. शहरातील जालानगरचा रहिवासी असलेला वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना याचा या घटनेत सहभाग होता. हल्ल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. तर बिष्णोई गॅंगमध्ये असलेल्या लोकांबरोबर तो सातत्याने संपर्कात असल्याचं देखील उघड झालं आहे.
वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना हा छत्रपती संभाजी नगर शहरातील रहिवासी?
बिष्णोईच्या सदस्यांशी संपर्कात असलेला वसीम चिकना हा मूळ शहरातील जालान नगर येथील रहिवासी आहे. तो सातत्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये वास्तव्यास होता. सलमान खानच्या घरावर हल्ला करण्याच्या कटात त्याला, फार्म हाउसची रेकी करणे, काडतूस आणि शस्त्राची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे तो फार्म हाऊसच्या परिसरात भाड्याची खोली देखील शोधत होता. तर त्याचा एक भाऊ हॉटेलमध्ये काम करत असून अनेक वर्षांपासून तो मुंबईलाच राहतो. एका वेळी त्याला शस्त्र बाळगल्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.