मुंबई -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून, सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. या निवडणुका मिनी विधानसभेप्रमाणेच होतील, असं म्हटलं जातंय. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करेल, अशा चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील 16 महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याबाबत समन्वय समिती स्थापन करून नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. अशातच राज ठाकरे यांच्या पक्ष बैठकीनंतर आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्याने भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात.
राज ठाकरेंबाबत भाजपाची नेहमीच मैत्रीपूर्ण भूमिका : आशिष शेलार यांच्या भेटीनंतर लगेचच मोहित कंबोज यांनीदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. आता या दोन्ही भाजपा नेत्यांची राज ठाकरेंसोबत झालेली चर्चा आणि त्यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट ही एक सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात असले तरी यामागे येत्या पालिका निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याच्या सध्या चर्चा आहेत. यावर आता थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी म्हटले आहे की, राज ठाकरेंबाबत भारतीय जनता पक्ष नेहमीच मैत्रीच्या भूमिकेत राहिलाय. त्यांच्याशी आमचे वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध आहेतच, पण आमचे वैचारिकदेखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बाळासाहेबांचे विचार, त्यांचं हिंदुत्व राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. भाजपाचे विचार आणि राज ठाकरेंच्या मनसेचे विचार सारखेच असल्याने आम्ही पूर्वीपासूनच त्यांच्याबाबत सकारात्मक आहोत, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
राज ठाकरे आणि आशिष शेलार ही केवळ सदिच्छा भेट :या संदर्भात आम्ही भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सदिच्छा भेट होती. आशिष शेलार आता मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागांतर्गत काही चर्चा झालेली असू शकते. आताच विधानसभा निवडणुका झाल्यात. आपलं नवीन सरकार बसलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची केवळ सदिच्छा भेट होती, इतकाच अर्थ आहे. यात दुसरा कोणताही अर्थ नाही, असं उपाध्ये यांनी म्हटलंय.