मुंबई High Court Decision: बायकोकडून पोटगी मागण्याचा नवर्याला हक्क असून महिलांप्रमाणं पुरुषांनाही पोटगी मागण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय. आजारपण वा अन्य कारणामुळं उत्पन्न कमावण्यास सक्षम नसलेल्या बेरोजगार पतीला कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा कायदेशीर हक्कच आहे, असं स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयानं कल्याणच्या बेरोजगार पतीला दरमहा 10 हजार रुपयांची पोटगी मंजूर केलीय.
पतीला पोटगी देण्याचा निर्णय : संसारात मतभेद झाल्यानंतर पतीनं विवाहसंबंध संपुष्टात आणण्यासाठी कल्याणच्या न्यायालयात धाव घेतली होती. या दरम्यान पतीसह पत्नीनं परस्परांकडं पोटगी मागत अर्ज केला. यापैकी पत्नीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला, तर पतीचा अर्ज मंजूर केला. आजारपणामुळं कमाई करण्यास सक्षम नसलेल्या पतीला कमावत्या पत्नीनं दरमहा 10 हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी, असा आदेश कल्याणच्या न्यायालयानं दिला होता. सहदिवाणी न्यायाधीशांनी 13 मार्च 2020 रोजी दिलेल्या या आदेशाला पत्नीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पत्नीनं मुंबई उच्च न्यायालयात केलेलं आव्हान फेटाळलं आणि पतीला पोटगी देण्याचा कल्याण न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.