मुंबई -'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना महाराष्ट्रात क्रांतिकारी योजना ठरली आहे. मध्य प्रदेशमधील 'लाडली बहीण' या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलेच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात आलेत. ह्या योजनेला गाव-खेड्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. तसेच महायुती सरकारला पुन्हा सत्तेत येण्यास 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना कारणीभूत ठरली आहे.
तीन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा : शासनाच्या आकडेवारीनुसार, 2 कोटी 47 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालाय. या योजनेतील पहिला हफ्ता 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे दोन हफ्ते ऑगस्ट महिन्यात जमा झालेत. यानंतर सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकूण तीन महिन्यांचे पैसे सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेत. आचारसंहितेपूर्वीच नोव्हेंबर महिन्याचेही सरकारने पैसे दिल्यामुळं लाडक्या बहिणींमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. परिणामी महायुतीसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना ऐतिहासिक आणि क्रांतिकारी योजना ठरलीय. दरम्यान, निवडणुकीपूर्वी या योजनेत 1500 रुपयांऐवजी यात 600 रुपयांची वाढ करून 2100 रुपये देण्याची घोषणा महायुतीनं केली होती. त्यामुळं आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. या योजनेचा फायदा महायुतीला निवडणुकीत झाला आणि ते पुन्हा सरकारमध्ये येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. या योजनेमुळं लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, अशी नवीन ओळख तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची झालीय.
लाडका भाऊ प्रतिमा कशी तयार झाली? :2022 ला मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं. 40 आमदारांना सोबत घेऊन सुरत, गुवाहाटी व्हाया गोवा आणि मुंबई असा प्रवास करत शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केले. यावेळी अनपेक्षितरीत्या त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मागील अडीच वर्षांत स्वतःला झोकून देत काम केल्याचं बोललं जातंय. पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करणे आणि रात्री एक-दोन वाजेपर्यंत बैठका घेणे, गाठीभेटी घेणे, असं अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांचे काम राहिले. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अनेक लक्षवेधी योजना आणल्या. या योजनेतील ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. या योजनेमुळं महायुतीला विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. या योजनेमध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळताहेत. अद्यापपर्यंत या योजनेतील पाच हप्ते मिळून एकूण 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय :एकीकडे देशाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अजूनही गाव-खेड्यात म्हणाव्या तशा सुविधा पोहोचल्या नाहीत. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना मोठा संघर्ष करावा लागतोय. मूलभूत गरजा भागवणे किंवा उदरनिर्वाह कसा करायचा? हा त्यांच्यासमोर प्रश्न असतो. परंतु एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानं गाव-खेड्यातील लोकांना हे पैसे मोठा दिलासादायक ठरताहेत. त्या पैशांचा संसाराला मोठा हातभार लागत आहे. ही योजना महिलांच्या पसंतीस उतरल्यामुळं लाडक्या बहिणींनी सरकारला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं बोललं जातंय. लाडक्या बहिणींच्या निर्णायक आणि विक्रमी मतदानामुळं महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकीकडे या योजनेचा सरकारला फायदा झाला तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आणलेल्या या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक योजनेमुळं त्यांची समाजात आणि लाडक्या बहिणींत "लाडका भाऊ" अशी प्रतिमा हळूहळू तयार होऊ लागलीय.
बहिणींमुळं नवीन ओळख लाडका भाऊ :एकनाथ शिंदे लोकांसमोर जाऊन काम करणारे नेते आहेत, फिल्डवर उतरणारा माणूस आहे. आपण फेसबुकवर बोलणारे नसून फेस टू फेस बोलणारे आहोत, असं आपल्या बोलण्यातून ते वारंवार सांगत आलेत. त्याचा प्रत्ययही त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलाय. सामान्य आणि तळागळातील लोकांमध्ये मिसळणे, जो कोणी आपल्याला भेटायला येईल, त्याला भेट देऊन त्यांच्या प्रश्न, समस्या सोडवण्यावर भर देणे आणि कोणीही जो काम घेऊन येईल, त्याचे काम करण्याचा 100 टक्के प्रयत्न हा एकनाथ शिंदेंकडून झाल्याचं सर्वांनी पाहिले. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर त्यांना अनेक लाडक्या बहिणी वर्षा बंगल्यावर भेटायला येतात. त्या लाडक्या बहिणींकडून आम्हाला आमच्या घरातीलच तुम्ही आमचे लाडके भाऊ वाटत आहात, अशी प्रतिक्रिया लाडक्या बहिणींकडून ऐकायला मिळाल्यात.
योजनेमुळं महिलांच्या संसाराला मदत : "मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे आम्ही व्यवसाय सुरू केला, या योजनेमुळं आमच्या संसाराला मदत होत आहे." अशा बोलक्या प्रतिक्रिया लाडक्या बहिणींकडून येताहेत. दरम्यान, या योजनेमुळे महायुतीला गाव-खेड्यात आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात यश आलंय. या योजनेतील प्रमुख नेते एकनाथ शिंदेंच ठरलेत. या योजनेचं श्रेय जसे महायुतीला मिळाले, तसेच श्रेय एकनाथ शिंदेंनादेखील मिळाले. परिणामी गाव-खेड्यात किंवा शहरी भागात लाडक्या बहिणींत एकनाथ शिंदेंची प्रतिमा लाडका भाऊ अशी निर्माण होऊन एकनाथ शिंदेंची नवीन ओळख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, अशी झालीय. या योजनेनंतर आताही एकनाथ शिंदेंना लाडका भाऊ या नवीन नावाने ओळखले जाते. त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा फायदा जसा राज्यातील महिलांना झाला, तसा महायुती सरकारलाही झाला आणि यासोबतच एकनाथ शिंदेंना लाडका भाऊ, अशी नवीन ओळख लाडकी बहीण योजनेमुळं मिळाली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
एकनाथ शिंदेंची नवीन ओळख 'लाडका भाऊ' कशामुळं? 'ही' योजना ठरली गेमचेंजर - YEAR END 2024
लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला निवडणुकीत झाला. या योजनेमुळं लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, अशी नवीन ओळख तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची झालीय.
एकनाथ शिंदे (Source- ETV Bharat)
Published : Dec 16, 2024, 1:38 PM IST