पुणे- काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आता धर्माच्या नावावर मतदान केलं जात असल्यानं वाईट वाटत असल्याचं म्हटलं. त्याला आता प्रणिती शिंदेंचे वडील आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी दुजोरा दिलाय. आजपर्यंत लोकांनी कामावर मतदान केलंय, पण आता धर्माच्या नावावर मतदान केलं जातंय, याचं मला वाईट वाटत असल्याचं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय. यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, समाज हा आता कुठेतरी धर्मावर, जातीवर मतदान करण्याचा विचार करीत आहे आणि त्याच्यावर मतदान होताना पाहायला मिळतंय. हे या देशाच्या दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने चुकीचं असल्याचं मत यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय.
दिल्लीमध्ये साहित्य संमेलन ठेवणं म्हणजे धाडस : महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वतीने दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आलंय. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी सुशील कुमार शिंदे म्हणाले की, सरहद संस्था आणि संजय नहार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन ठेवण्याचं एक धाडस त्यांनी केलंय. त्यांचं हे धाडस यशस्वी व्हावं, अशीदेखील प्रार्थना करतो, असंही यावेळी शिंदे म्हणालेत.
प्रदेशाध्यक्ष बदलायचे असतील तर ते बदलतील : यावेळी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, अजून याचा तपास हा होत आहे, एकदम मला त्यावर बोलणं जमणार नाही. पण जनतेकडून जो आवाज येतो, त्याचं निरीक्षण केलं गेलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलंय. पुढे त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, हाय कमांडच्या मनात काय आहे हे सांगता येणार नाही. प्रदेशाध्यक्ष बदलायचे असतील तर ते बदलतील, मला यातील काही माहीत नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा -