महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!

Abhishek Ghosalkar Murder Case : शिवसेना उबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा मॉरिस नरोना यानं गोळ्या घालून खून केला. या घटनेनंतर मॉरिसनं देखील आत्महत्या केली. मॉरिस हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं आता पुढं येत आहे.

Abhishekh Ghosalkar Murder Case
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 12:49 PM IST

Updated : Feb 12, 2024, 2:12 PM IST

मुंबई Abhishekh Ghosalkar Murder Case : शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. गोळीबार करणाऱ्या मॉरिस नरोना यानं स्वतःला देखील गोळी मारुन आत्महत्या केली आहे. नेमकं मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार का केला? त्याचं काय कारण आहे, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. गोळीबार करण्यापूर्वी मॉरिस यानं फेसबुक लाईव्ह केलं आहे. हा सर्व प्रकार समाजमाध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. या घटनेनं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र हे प्रकरण का घडलं, याची माहिती या वृत्तातून आपण पहणार आहोत.

पोलिसांनी रेकी करणाऱ्या दोघांना घेतलं ताब्यात :शुक्रवारी सकाळी एमएचबी पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मेहुल पारेख आणि रोहित शाहू उर्फ रावण या दोन संशयितांनी ऑफिसची रेकी केली होती. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्यानं तपासासाठी पोलिसांकडून वेगवेगळे पथक नेमण्यात आले आहेत. या दोन व्यक्तींना या घटनेची संपूर्ण माहिती असल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेच्या टीमकडून या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.

कोण आहे मॉरिस नरोना ? :मॉरिस नरोना हा तथाकथित समाजसेवक आहे. कोरोना काळात त्यानं अनेक नागरिकांना आर्थिक आणि धान्य पुरवठा करुन मदत केली. रिक्षा चालक, तसेच दहिसर पश्चिमेच्या गणपत पाटील नगरमध्ये झोपडपट्टीत मॉरिस राशन वाटप करत असे. समाजसेवा करत असताना त्याला नगरसेवकपद खुणावू लागलं. त्याची महत्वाकांक्षा वाढत गेली. ज्या परिसरात मॉरिस समाजसेवक म्हणून काम करत होता, त्या परिसरात विनोद घोसाळकर यांचा मागील 10 वर्षांपासून दबदबा आहे. विनोद घोसाळकर हे दिवंगत अभिषेक घोसाळकर यांचे वडील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट चे माजी आमदार आहेत.

विनोद घोसाळकर यांचा बालेकिल्ला :विनोद घोसाळकर हे नगरसेवक म्हणून या परिसरातून निवडून आले होते. त्यानंतर दहिसर विधानसभा क्षेत्रातून ते आमदार झाले. पुन्हा त्यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर हे सन 2009, 2014 ला नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांची पत्नी 2019 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या. तब्बल वीस वर्षांपेक्षा अधिक काळ या परिसराचं नेतृत्व घोसाळकर परिवारानं केलं. त्यामुळे घोसाळकर यांचा बालेकिल्ला म्हणून हा परिसर ओळखला जातो.

मॉरिसला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक :एका महिलेच्या तक्रारी वरून मॉरिस याला सन 2022 साली बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात महिलेला अभिषेक घोसाळकर यांनी मदत केल्याचा संशय मॉरिसला होता. त्याचा राग त्याच्या मनात असल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणात मॉरिस सहा महिने तुरुंगात होता. त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर त्यानं दिवाळीमध्ये अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली. दहिसर बोरवली परिसरामध्ये अभिषेक यांच्यासोबत दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाचे बॅनर देखील मॉरिसनं लावले.

मॉरिसच्या मनात जेलमध्ये गेल्याचा राग :आपण जेलमध्ये गेल्याचा राग मॉरिसच्या मनात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांचा काटा काढण्यासाठी त्यांनी मैत्री केली आणि थंड डोक्याने अभिषेकच्या हत्येची योजना आखल्याचा दावा करण्यात येत आहे. मॉरिस भाई म्हणून तो आयसी कॉलनीत ओळखला जातो. तथाकथित समाजसेवक म्हणून वावरणाऱ्या मॉरिसचं कार्यालय आलिशान आहे. मॉरिसच्या कार्यालयात गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं देखील येणं जाणं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मॉरिसकडं बंदूक आली कुठून :पोलिसांनी या प्रकरणात मॉरिसचे समर्थक मेहुल पारेख आणि राहुल साहू उर्फ रावण या दोघांना चौकशीकरता ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी मॉरिसला गुन्हा करण्यासाठी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच या घटनेच्या अगोदर या दोघांनी रेकी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मॉरिसच्या कार्यालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासले जात आहेत. मॉरिसनं वापरलेली बंदूक आणि जिवंत काडतूसं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. मॉरिसकडे बंदूक आली कुठून...? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मॉरिसकडं कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नव्हता. त्यामुळं या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील राणे यांनी दिली आहे. मात्र मॉरिसकडं असलेली ही बंदूक दहिसरमधील एका अधिकृत बंदूक परवाना असलेल्या व्यक्तीकडून दहा लाख रुपये देऊन विकत घेतल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

  1. मोठी बातमी! फेसबुक लाईव्हदरम्यान गोळीबार; ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू, गोळीबाराचा थरार समोर
  2. ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; विरोधक आक्रमक
Last Updated : Feb 12, 2024, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details