पुणे Flood situation in Pune :शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. 25 जुलै रोजी पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तसंच दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळं पुराचं पाणी सिंहगड रोड येथील एकता नगरी, शिवाजी नगर येथील पाटील इस्टेट परिसरात घुसलं होतं. त्यामुळं या पूरस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे, असा प्रश्न निर्माण होतोय. याबाबत पर्यावरण तज्ञ सारंग यादवाडकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला आहे.
मानवी हस्तक्षेपामुळं परिस्थिती :"जुलै महिन्यात झालेल्या पावसानं पुण्यातील धरण क्षेत्रातून 24 जुलै रोजी जवळपास 35 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं. तसंच काल 45 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून मोठं नुकसान झालय. पुण्यात झालेल्या मुसळधार पाऊस तसंच धरण क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं आज पुण्याची परिस्थिती वाईट झालीय. नद्यांचे प्रवाह कमी जास्त होणं, एक नैसर्गिक क्रिया आहे. नदीपात्रात वसाहत बांधणं, हा मानवी हस्तक्षेप आहे. अशा हस्तक्षेपामुळं नदीपात्रातील पाणी पसरत चाललं आहे. पुणे हे पूर प्रवण महानगर असून पुण्यात पाच नद्या आहेत. या नद्यांचा प्रवाह मुठा-मुळा नदीतून होतो. याच नद्याकांठी पुणे शहर वसलेलं आहे. तसंच पुणे शहराच्या आजूबाजूला आठ धरणं आहेत. या सर्व धरणांचा विसर्ग देखील पुण्यातून होतो. यावर्षी या सर्व धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. तसंच पाणलोट क्षेत्रात देखील जास्त पाऊस झाला. त्यामुळं धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे नदीपात्रात मानवी हस्तक्षेप झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं" यादवाडकर म्हणाले.