कोल्हापूर Kirti Stambh Kolhapur : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेल्या कलानगरी कोल्हापुरची क्रीडा परंपरा येथील खेळाडूंनी सातासमुद्रापार पोहोचवली आहे. ज्या खेळाडूंनी कोल्हापूरचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं त्या खेळाडूंच्या सन्मानार्थ 13 फेब्रुवारी 1960 या दिवशी उभारण्यात आलेला भवानी मंडप येथील क्रीडा कीर्ति स्तंभचं अडगळीत पडला आहे, 24 वर्षांपासून या स्तंभाचं अध्ययवतीकरणही झालेलं नाही, आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं देशातील एकमेव असलेल्या या कीर्ति स्तंभाला सन्मान कधी मिळणार? असा प्रश्न आता कोल्हापूरकर विचारत आहेत.
स्तंभावर अनेक खेळाडूंची नावं : कोल्हापुरातील भवानी मंडपातील प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर देशभरातून अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून क्रीडा कीर्ति स्तंभ छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. 13 फेब्रुवारी 1960 या दिवशी पटियाला संस्थानाचे महाराज यादवींद्र सिंह यांच्या हस्ते या कीर्ती स्तंभाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र सबनीस यावेळी उपस्थित होते. याच स्तंभावर जागतिक पातळीवर कोल्हापूरचं नाव अधोरेखित करणाऱ्या खेळाडूंची नावं कोरली जावीत, या उद्देशानं छत्रपती राजाराम महाराजांनी हा स्तंभ उभारला. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर अनेक खेळाडूंनी कोल्हापूरची क्रीडा परंपरा जागतिक पातळीवर पोहोचवली. मात्र, त्यांची नावं या स्तंभावर कोरण्यात आलेली नाहीत. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराला भेट देणाऱ्या विदेशी आणि देशभरातील भाविकांचं लक्ष वेधणाऱ्या या स्तंभावर आपलंही नाव असावं अशी अपेक्षा राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणारे कुस्तीपटू राम सारंग यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.