सातारा - कोयना धरणातून दीड महिन्यापासून पाणी न सोडल्यानं पुर्वेकडे निर्माण झालेल्या टंचाई संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं आज सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्याची कोयना धरण व्यवस्थापनाने दखल घेतली असून उद्या (मंगळवारी) सकाळी धरणातून कोयना नदीपात्रात पाणी सोडलं जाणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
कोयना, कृष्णा नदीचं पात्र पडलं कोरडं : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात यंदा सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळं धरण तुडुंब भरलं होतं. १०५.२७ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात आजमितीला तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु, २३ ऑक्टोंबरपासून आजअखेर पाणी न सोडल्यानं कोयना आणि कृष्णा नद्यांचं पात्र कोरडं पडलं आहे. पात्रात पाण्याची डबकी झाली आहेत. त्या पाण्याचा रंग आणि चव बदलली असून दुर्गंधी देखील येत आहे, असं स्थानिकांनी सांगितलं.
नदीकाठच्या गावांतील पाणी पुरवठा ठप्प :कोयना आणि कृष्णा नदीतून सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, नदीपात्र कोरड पडल्यानं पाणी योजनांचे जॅकवेल उघडे पडले. परिणामी, अनेक गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला. कळशा, घागरी घेऊन नदीपात्रात साचलेलं पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळं टंचाईची गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आली.