नवी मुंबई Uran Girl Murder Case :उरण इथल्या तरुणीच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. हत्येच्या अगोदर दाऊद शेख हा पीडितेचा पाठलाग करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं आहे. तो व्यक्ती दाऊदचं असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी कर्नाटक इथल्या गुलबर्गामधील शाहपूरमधून दाऊदला ताब्यात घेतलं आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात पीडितेवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे उरण तरुणी हत्या प्रकरण :उरणमधील 22 वर्षाची तरुणी हरवल्याची तक्रार गुरुवार 25 जुलैला उरण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. उरण पोलीस ठाण्यातील पोलीस बेपत्ता तरुणीचा शोध घेत होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजता या पीडित तरुणीचा मृतदेह उरणमधील कोटनाका इथल्या पेट्रोल पंपाजवळ सापडला. या तरुणीचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय इथं नेण्यात आला. तरुणीचं शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्रानं वार करून तिची हत्त्या केल्याचं निष्पन्न झालं. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. पीडितेच्या हत्येप्रकरणी उरण शहरात रोष पाहायला मिळाला. मोठ्या संख्येनं एकत्र येत नागरिकांनी पीडितेच्या खूनप्रकरणी निषेध व्यक्त केला. संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी, अशीही मागणी नागरिक करत आहेत.
दाऊदला झाली होती पोस्को अंतर्गत शिक्षा :दाऊद शेख मूळचा कर्नाटक इथला असून तो उरण शहरात कामानिमित्त आला. दाऊद हा व्यवसायानं चालक होता. पीडिता ही 15 वर्षाची अल्पवयीन असताना दाऊद शेख यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. तिच्यावर 2019 ला त्यानं अत्याचार केले. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी उरण पोलीस ठाण्यात दाऊदविरुद्ध तक्रार दाखल केली. दाऊद शेखवर पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला शिक्षाही झाली. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून सुटला. पीडितेवर बदला घेण्यासाठीच 22 जुलैला उरणमध्ये आला. विशेष म्हणजे दाऊद हा पीडितेला फोन करुन त्रास देत असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. उरणमध्ये आल्यावर पीडितेचा पाठलाग करायला सुरुवात केली. दाऊद पीडितेचा पाठलाग करत असल्याची बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील उघड झालं आहे.
अंगावरील टॅटूवरुन पटली पीडितेची ओळख :गुरुवारी 25 तारखेला दुपारी दीड वाजता मैत्रिणीकडं जाते सांगून घराबाहेर पडलेली पीडिता बराच वेळ होऊन घरी आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी उरण पोलीस ठाण्यात पीडिता बेपत्ता असल्याची तक्रार केली. अखेर शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास उरण रेल्वे स्थानकाच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या एका निर्जन जागी पीडितेचा मृतदेह सापडला. पीडितेच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडलेले पाहायला मिळाले. तिच्या गुप्तांगावर देखील चाकूनं वार केले होते. पीडितेची कपडे, टॅटू यावरून तिची ओळख पटली. हा मृतदेह पाहताच तिच्या आईनं हंबरडा फोडला. दाऊद शेख हा आपल्या मुलीला सतत त्रास देत होता. त्यामुळे त्यानंच आपल्या मुलीची हत्या केली असेल, हे आई-वडिलांनी पोलिसांना सांगितलं.