मुंबई Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येत असून ते 'लालबागचा राजा'च्या चरणी नतमस्तक होणार आहेत. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. अमित शाह दरवर्षी 'लालबागचा राजा'च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईमध्ये सहकुटुंब येतात, त्याच प्रकारे यंदाही त्यांचा दौरा असला, तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा फार महत्त्वाचा मानला जात आहे.
रंगणार राजकीय खलबतं :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गणेशोत्सवात दरवर्षी 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला येततात. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी हा त्यांचा तिसरा दौरा आहे. आज सायंकाळी अमित शाह मुंबईत येत असून सायंकाळी साडेसात वाजता मुंबईतील सांताक्रुज एअरपोर्ट शेजारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ते एक डॉक्युमेंटरी लॉन्च करणार आहेत. त्यानंतर आज रात्री त्यांचा मुक्काम राज्य सरकारच्या सह्याद्री या अतिथी गृहात असणार आहे. याच दरम्यान आज रात्री उशिरा आणि उद्या सकाळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी अमित शाह यांच्यासोबत होणार आहेत. या चर्चेमध्ये विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. विशेष म्हणजे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न अमित शाह या दौऱ्यात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.