मुंबई:नवी मुंबईतील उरण परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. (accident caught on cctv) अशीच एक घटना आज (8 फेब्रुवारी) घडली. यामध्ये एनएमएमटी बस चालकाचं आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं जुईनगर भागात दोन मोटारसायकलस्वारांना आणि टेम्पोला धडक दिली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला तर दुसरा तरुण मृत्युमुखी पडला आहे. विशेष म्हणजे, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे प्रकरण ?एनएमएमटी बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव वेगातील बसनं नवी मुंबई परिसरातील उरण येथील खोपटा-कोप्रोली रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांना आणि टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावले असले तरी दोन मोटारसायकलस्वारांना बसनं फडफडत नेलं. या घटनेत निलेश शशिकांत म्हात्रे (25) यांचा मृत्यू झाला आहे तर केशव ठाकूर (35) हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघात झाल्यानं नागरिक संतप्त :या अपघाताची माहिती मिळताच खोपटा परिसरातील संतप्त नागरिकांनी 'रास्ता रोको' करून बस चालकावर तसेच संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत कुटुंबीयांचं सांत्वन केलं. सोबतच त्यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.