पुणे : अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) हा 'महाराष्ट्र केसरी'चा (Maharashtra Kesari 2025) मानकरी ठरला आहे. त्यामुळं ‘महाराष्ट्र केसरी’चा खिताब मिळवण्याचं मोहोळ कुटुंबानं पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरलय. मात्र, यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळाचं गालबोट लागलं. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यानं थेट पंचांना लाथ मारली. मात्र, या गोधळानंतर अखेर पंचांनी मोहोळला विजयी घोषित केलं.
पृथ्वीराज मोहोळ यांची प्रतिक्रिया : महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावल्यानंतर पृथ्वीराज मोहोळ यानं आज (3 फेब्रुवारी) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाचं दर्शन घेत आरती केली. त्यानंतर 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना तो म्हणाला की, "मला खूप आनंद होतोय की मी माझ्या घरच्यांचं स्वप्न हे पूर्ण केलंय. काल जो विजय मिळालाय, त्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी जी काही मेहनत घेतलीय, त्याचं हे यश आहे. गेल्या वर्षभरापासून या स्पर्धेसाठी तयारी करत होतो. या संपूर्ण तयारीमध्ये माझे वडील माझ्या सोबत होते आणि त्यांनीच मला तयार केलंय." पुढं मोहोळ म्हणाला, "जे काही यश मिळालंय ते माझ्या आई-वडिलांचं आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं आहे. कालपासून आई माझी वाट पाहतीय. ती जेवली देखील नाही. आता मी तिला भेटायला जाणार आहे."
शिवराज राक्षेच्या आक्षेपावर काय म्हणाला? : रविवारी (2 फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात शिवराज राक्षे यानं जे काही आक्षेप घेतले आणि पंचाना लाथ मारली त्याबाबत पृथ्वीराज मोहोळला विचारलं असता तो म्हणाला, "मी एक खेळाडू आहे. पंचांनी दिलेला निर्णयच अंतिम असतो. जेव्हा पंचांनी माझ्या बाबतीत निर्णय दिला. तेव्हा मी तो अंतिम निर्णय मानला. काल जे काही झालं ते चुकीचं होतं. त्याबद्दल फेडरेशनकडून देखील कारवाई झाली आहे", असं पृथ्वीराज मोहोळ म्हणाला.
हेही वाचा -