महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश - Uddhav Thackeray On Election

Uddhav Thackeray On Election : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. हे बघता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. तिकडे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर बातमी

Uddhav Thackeray On Election
उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 7:15 PM IST

मुंबईUddhav Thackeray On Election : राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्यात. यात महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसला चांगलं यश मिळालं. दरम्यान, लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता चार-पाच महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. निवडणुकांबाबत रणनीती ठरवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज शिवसेना (ठाकरे गटाकडून) पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुखांची मुंबईतील शिवसेना भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

कामाला लागण्याचे आदेश :विधानसभा निवडणुकीला चार-पाच महिन्यांचा अवधी आहे; मात्र आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने आणि विधानसभेच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून इनडोअर बैठका घेण्यात येतील. पावसामुळं जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर इनडोअर मेळाव्यांचे, बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

मोदींना रोखण्यात महाराष्ट्राचे योगदान :पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीने भाजपा आणि त्यांच्या मित्रमंडळींना रोखले आहे. नरेंद्र मोदींचे बहुमत खाली आणण्यामध्ये किंवा भाजपाला बहुमत मुक्त करण्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठं आहे. महाविकास आघाडीचे योगदान मोठं आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली. 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी याबाबत सूचना देण्यात आल्या. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातल्या निवडणुका आहेत. कोकण पदवीधर असतील, शिक्षक मतदारसंघ असतील किंवा मुंबईतील पदवीधर शिक्षक मतदारसंघ असतील. या निवडणुकीबाबत देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली, असं राऊत म्हणाले.

मविआत एकत्रितपणे निवडणूक लढवू :आजच्या बैठकीत जिल्हाप्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आलेत की, 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी आहे. त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबुतीनं बांधणी होणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं कामाला लागा. एखादी विधानसभा आपण लढू किंवा लढणार नाही; पण आजपासूनच आपण उभे राहिले पाहिजे. त्या ठिकाणी चांगले काम केले पाहिजे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक आम्ही महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवू. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढू आणि 180 ते 185 विधानसभेच्या जागा जिंकू अशा प्रकारचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर आणि नांदेडसाठी ऑरेंज अलर्ट जारी - Maharashtra Breaking News
  2. पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबई"! अनेक भागात पाणी साचलं, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा - Maharashtra Rain Update
  3. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील सहा मंत्र्यांकडे 'ही' खाती येण्याची शक्यता - Expected Portfolio for Maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details