चंद्रपूर : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यात देखील भाजपानं इतिहास रचला आणि सहापैकी तब्बल पाच जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले. यात ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे सलग सातव्यांदा निवडून आले, तर बंटी भांगडीया हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकले. अशावेळी मंत्रिपद कुणाला मिळणार, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा आमदार : 2014 मध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आणि सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे अर्थ आणि वनमंत्री झाले. 2022 मध्ये पुन्हा भाजपाची सत्ता येताच सुधीर मुनगंटीवार यांना वनमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. सुधीर मुनगंटीवार हे सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत जिंकून आले आहेत. तर चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली. यावेळी ते सलग तिसऱ्यांदा जिंकून आले आहेत. अशावेळी मंत्रिपद कुणाला मिळणार, यावर आता चर्चेला पेव फुटले आहेत.
सुधीर मुनगंटीवार आणि बंटी भांगडिया यांच्यात शीतयुद्ध : बंटी भांगडिया आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात असलेलं शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. बंटी भांगडिया हे देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक मानले जातात. सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री असताना एकदा बंटी भांगडिया हे शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन चंद्रपुरात आले. सत्तेत असताना सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यानं सुधीर मुनगंटीवार हे चांगलेच नाराज झाले. यावेळी नाराज झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी बंटी भांगडिया यांची चांगलीच कानउघाडणी केली. यानंतर बंटी भांगडिया हे कधीही मोर्चा घेऊन चंद्रपूरला आले नाहीत. अपवाद वगळता जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही सुधीर मुनगंटीवार हे कधी चिमूर येथे फिरकले नाहीत. हे दोघं सहसा कुठल्या व्यासपीठावर देखील दिसत नाहीत. सध्या सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा निवडणूक जिंकले आहेत, तर बंटी भांगडिया यांनी विजयाची हॅट्रिक साधली. जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे देवराव भोंगळे हे राजुरा विधानसभा क्षेत्रातून निवडून आले. तर चंद्रपूर येथून किशोर जोरगेवार आणि वरोरा येथून करण देवतळे हे भाजपाचे आमदार झाले. जोरगेवार हे भांगडिया यांचे निकटवर्तीय आहेत. अशावेळी मंत्री पदासाठी चांगली चुरस होऊ शकते. सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच दिल्ली गाठली आणि दिल्लीतील काही बड्या नेत्यांची त्यांनी भेट देखील घेतली. आता नेमकं मंत्रिपद कुणाच्या पारड्यात पडते, याकडं सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा :
- भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; आमदार बंटी भांगडियांच्या शुभेच्छा फलकावर मुनगंटीवार यांचा फोटो तर सोडा साधा उल्लेखही नाही - Bunty Bhangdiya Birthday Banner
- MLA Bunty Bhangdia : भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल; काँग्रेस कार्यकर्त्यासोबत झाला वाद
- महाराष्ट्रातील भाजपा आमदार आणि राजस्थान पोलिसांमध्ये हाणामारी