मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 होत असल्यानं विरोधकांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाकडं तक्रार केली. त्यामुळे निवडणूक आयोगानं बदलीचे आदेश मुख्य सचिवांना दिल्यानं रश्मी शुक्लांची बदली करण्यात आली. आता मात्र राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर सरकारनं पुन्हा पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सरकार स्थापन होण्याअगोदरचं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चपराक लगावून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीनं दणदणीत विजय नोंदवला. महायुतीनं राज्यात विधानसभेच्या 288 पैकी 230 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगानं शनिवारी निकाल जाहीर केला. त्या निकालात भाजपानं 132 जागा जिंकल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला 57 जागा मिळाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 41 जागा जिंकल्या. मात्र निकालात महायुतीनं आघाडी घेतल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली. सरकारनं रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केलं आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
महाविकास आघाडीचा दारूण पराभव : महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षाला 20 जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसनं 16 जागावर यश मिळवलं. दुसरीकडं शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानं विरोधकांच्या गोटात सध्या स्मशान शांतता पसरली आहे.
हेही वाचा :