पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी बहुमत मिळालं. आता महायुतीत मुख्यमंत्री कोण यावर आत्ता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मला विधान परिषद नको, द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रिपद द्या, अशी मागणी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल (24 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्याला उत्तर देण्यासाठी आज (25 नोव्हेंबर) ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केलं.
कॅबिनेट मंत्रिपद द्या : पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, "आम्ही या निवडणुकीत महायुतीला जाहीर पाठिंबा दिला. महायुतीत जो कोणी मुख्यमंत्री होईल, त्याला आमच्या शुभेच्छा असून मला विधान परिषद नव्हे, तर काही द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रिपद द्या.ओबीसी आंदोलनाला चिल्लर समजू नका."
जरांगेंनी माहिती घेऊन बोलावं : यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला. "जरांगे पाटील यांनी मी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे तिथे विरोधकांना कमी मतं मिळाली असल्याचं. जरांगेंनी थोडीशी माहिती घेऊन बोललं पाहिजे. उलट मी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं तिथं आमच्या उमेदवारांना भरभरून मतदान झालं. आम्ही दोन महिन्यांपासून बोलत होतो की, आम्ही राजेश टोपे यांचा पराभव करणार आणि या निवडणुकीत आम्हीच राजेश टोपे यांचा पराभव केला. मराठा समाजाच्या तरुणांची माथी भडकावून दोन समाजात विद्वेष तयार करणाऱ्या जरांगे पाटीलांना या निवडणुकीत आम्ही चपराक दिली. आम्ही महायुतीच्या बाजूनं जाहीर भूमिका घेतली म्हणून आज राज्यात महायुतीच सरकार आलं आहे," असं म्हणत हाके यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा