महाराष्ट्र

maharashtra

'राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा - Uddhav Thackeray targeted Fadnavis

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 4:09 PM IST

Updated : Jul 31, 2024, 4:20 PM IST

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीच सत्ताधारी तसंच विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं मुंबईतील रंगशारदा येथे शाखाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिलाय.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस (Etv Bharat MH Desk)

मुंबई Uddhav Thackeray On Devendra Fadnavis :भाजपा तसंच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षातील राजकीय वैर संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. देवेंद्र फडणवीस तसंच उद्धव ठाकरे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बुधवारी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलंय. आता एकतर फडणवीस राजकारणात राहतील नाहीतर मी राहीन, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी त्यांना दिलाय.

देवेंद्र फडणवीसांना इशारा : उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करत होते. "माझा पक्ष गेला, पक्षाचं चिन्ह गेलं, आमदार, खासदार गेले, पदाधिकारी गेले, नगरसेवक गेले. या सर्वांना फोडण्याचं काम भाजपानं केलं. त्यांनी माझा पक्ष फोडला. एवढं सगळं होऊनसुद्धा मी सहन करत आहे. त्यामुळं आता राजकारणात एकतर मी राहणार किंवा देवेंद्र फडणवीस राहणार," असा थेट इशारा त्यांनी दिला.

आईच्या कुशीत केला वार :गद्दारांनी शिवसेनेशी बेइमानी केली. गद्दारांवर दबाव होता, ईडीची भीती होती म्हणून ते पळून गेले. या गद्दारांनी सत्तेसाठी, पैशासाठी आईच्या कुशीत वार केला. यांना जनता कधी माफ करणार नाही. महाराष्ट्र गद्दारांना कधीच विसरणार नाही, असं टीकास्त्र ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डागलं.

मोदींना फोडला घाम :लोकसभा निवडणुकीत मी सरळ सरळ नडलो. सरळ आहोत तोपर्यंत सरळ राहिलो. नडलो तर असाच नडतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनासुद्धा घाम फोडलाय. दुसरीकडं राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्रात प्रचाराला यावं. त्यांची उरलीसुरली गुर्मी उतरवतो, असं आव्हान त्यांनी मोदी-शाहांना दिलं.

सत्तेचा गैरवापर :एका बाजूला सत्ता, पैसा, निवडणूक आयोग, केंद्रीय यंत्रणांचा वापर होतोय. सत्तेचा गैरवापर सत्ताधारी करतायत. मात्र, आम्ही सत्तेत आल्यानंतर अदानींना दिलेलं धारावीचं टेंडर रद्द करू. तसंच तुम्ही पैशानं सर्व विकत घेऊ शकत नाही. प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ता तुम्हाला मिळवता येणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर प्रहार केला.

शिवसेना नाव मिळेलच :माझ्या वडिलांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष गद्दारांनी चोरून नेला. शिवसेना नाव आम्हाला पुन्हा पाहिजे, ते मी मिळवणार आहेच. मात्र, तोपर्यंत 'मशाली'चा प्रचार घरोघरी जाऊन करा, असं आवाहन त्यांनी उपस्थित शाखाप्रमुखांना केलंय. तसंच सध्या मुंबईची लूट सुरू आहे. जवळच्या व्यक्तीला रस्त्याची तसंच अन्य प्रकल्पाचं कॉन्ट्रक्ट देणे सरकारकडून सुरू आहे. आमचं सरकार आल्यावर त्यावर बंदी घालण्यात येईळ, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

'हे' वाचलंत का :

  1. आमदार अमोल मिटकरी यांची कार फोडणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू, पोलिसांकडून 50 जणांवर गुन्हा दाखल - Amol Mitkari Vs Raj Thackeray
  2. 'मनसे हा सुपारीबाज पक्ष...,' आदित्य ठाकरेंचा टोला - Aditya Thackeray Pune Visit
  3. "मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला जाऊन...", वेषांतराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Criticism
Last Updated : Jul 31, 2024, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details