महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदी, अमित शाहांनाही घेतलं फैलावर - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंच्या प्रचार सभेत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 7:53 AM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बिंग फोडल्यानं ते चरफडले आणि भरकटले आहेत. मला भ्रमिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं, मी भ्रमिष्ट आहे की नाही हे जनता ठरवेल. मात्र त्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. "देवेंद्र फडणवीस म्हणजे लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे," अशी जहरी टीका ठाकरे यांनी केली. शनिवारी वडाळा अँटॉप हिल इथं दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली. आदित्यला अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री करतो, या विधानाचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

जनाची नाही तरी मनाची ठेवा :"अमित शाह बाळासाहेबांच्या खोलीत आले होते. शाहांनी फडणवीसांना बाहेर बसवलं. आता फडणवीसांना कुठलीतरी खोली वाटते. त्यांच्यासाठी बऱ्याच खोल्या असतील, परंतु मातोश्रीमधील बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे. त्याच खोलीत शाह नाक रगडायला आले होते," असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच "दिवंगत अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन ज्या खोलीत आले होते. नालायक माणूस ती खोली कुठली तरी खोली म्हणतो," असं सांगत ठाकरे यांनी फडणवीसांना फैलावर घेतलं. "चांगलं काम करण्यापूर्वी त्या खोलीत जाऊन बाळासाहेब, मॉ साहेबांसमोर आम्ही नतमस्तक होतो," अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. फडणवीसांनी ठाकरेंना भ्रमिष्ट संबोधलेल्या विधानाचा दाखला देत, जनाची नाही तरी मनाची ठेवा अशी टीका ठाकरेंनी केली.

मोदींना गुजरातला परत पाठवू :"मुंबईकरांनी रक्त सांडून मुंबई कमावली आहे. मुंबई आर्थिक राजधानी असल्यानं पंतप्रधान मोदी, शाहांना पोटदुखी आहे. मात्र, शिवसैनिक (ठाकरे) महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवू देणार नाहीत. उलट मोदींना गुजरातला परत पाठवू...., असा टोलाही ठाकरेंनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या मित्रानं मुंबईला लुटलं. अहमदाबाद आर्थिक राजधानी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच एमएमआरडीए मुंबई मनपातून 3 हजार कोटी रुपये मेट्रो कंत्राटदाराला दिली असून हे राज्य सरकार मुंबई महापालिका लुटत आहे. वेळ आली तर आम्ही एमएआरडीए रद्द करु," असा इशारा ठाकरेंनी दिला. तसेच कोरोना काळातील घोटाळ्यावरून न्यायालयानं सरकारवर केलेल्या टीकेचा दाखला देत त्यांनी लक्ष्य केलं.

मशाल, पंजा, तुतारीचा प्रचार करा :"पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात आपली लढाई आहे. हुकुमशाहीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं जोर लावला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आघा़डीचे उमेदवार आहेत. त्या त्या ठिकाणी आघाडीच्या उमेदवाराच्या मशाल, पंजा किंवा तुतारी या चिन्हांचा घरोघरी प्रचार करा. मशाल घेऊन पेटून उठा, निष्ठावंतांना निवडून आणण्यासाठी एकमतानं काम करा," असं आवाहन त्यांनी उपस्थिताना केलं.

हेही वाचा :

  1. "उद्धव ठाकरेंना वेड लागलंय"; ‘त्या’ दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर - Devendra Fadnavis Reply
  2. उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्री आले सहकाऱ्याच्या मदतीला, म्हणाले... - CM Eknath Shinde
  3. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आश्वासन; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ - Thackeray On Devendra

ABOUT THE AUTHOR

...view details