मुंबई - कॉमेडियन कपिल शर्माबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. त्याला एका अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. केवळ कपिल शर्माच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील सदस्य, त्याच्याबरोबर काम करणारे सहकलाकार यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कपिलच्या आधी अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही अशा प्रकारच्या धमकीचे ईमेल आले आहेत.
पाकिस्तानमधून धमकीचा ईमेल आला : कपिल शर्माला धमकीचा ईमेल पाठवणारा व्यक्ती आता कोण आहे, याबद्दल मुंबई पोलीस चौकशी करत आहे. याप्रकरणी मुंबईतील अंबोली पोलिसांनी कलम 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या कपिल आणि त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. ज्या ईमेलवरून कपिलला धमकी मिळाली, त्या ईमेलचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानचा असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान सुगंधा आणि रेमो डिसूझा यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय राजपाल यादवची पत्नी राधा यादव यांनी मुंबईतील अंबोली पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. आता हे प्रकरण खूप गंभीर आहे. यापूर्वी देखील अनेक स्टार्सला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. या सेलिब्रिटींच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.
ईमेल पाठवणाऱ्याचं नाव : मिळालेल्या माहितीनुसार, हा ईमेल विष्णूच्या नावाच्या व्यक्तीनं पाठवला आहे. दरम्यान 14 डिसेंबर 2024 रोजी पाठवलेल्या या ईमेलनं चिंता निर्माण केली आहे. हा ईमेल don99284@gmail.comवरून राजपाल यादवची टीम teamrajpalyadav@gmail.com अकाउंटवर पाठवण्यात आला होता.
ईमेलमध्ये काय आहे ? : दरम्यान या ईमेलमध्ये लिहिलंय, 'आम्ही तुमच्या अलीकडील हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. हा कोणताही प्रसिद्धी स्टंट नाही. तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही, आम्ही तुम्हाला हा संदेश अत्यंत गांभीर्यानं आणि गोपनीयतेनं घेण्याचा आग्रह करत आहोत.' तसेच मेल पाठविणाऱ्या व्यक्तीनं 'विष्णू' म्हणून सही केली आहे. अलीकडेच, राजकारणी बाबा सिद्दीकीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला आलेल्या धमक्या आणि सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर शहरातील सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत असल्याचं दिसत आहे. आता मुंबई पोलिसांनी दक्षता वाढवली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी याप्रकरणी केलं विधान : सदाशिव निकम यांनी म्हटलं, "पोलिसांनी तक्रार नोंदवली असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी तांत्रिक पथक तैनात करण्यात आले आहे. आयपी ॲड्रेस पाकिस्तानशी जोडला गेल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे. आम्ही सर्व संभाव्य कोनातून तपास सुरू केला आहे आणि अधिक तपशील लवकरच उपलब्ध होतील." याप्रकरणी अभिनेता राजपाल यादव याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.