जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (22 जानेवारी) भीषण दुर्घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागण्याच्या अफवा पसरल्यानं प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. मात्र त्याचवेळी भुसावळकडं जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं अनेकांना चिरडलं. या भीषण अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुःख व्यक्त केलंय.
"जळगावचा रेल्वे अपघात अतिशय भीषण होता. कुणीतरी अफवा पसरवली की, गाडीला आग लागली. म्हणून प्रवाशांनी त्यातून उड्या मारल्या आणि समोरुन येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं ही घटना दुःखद आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. मुख्यमंत्र्यांनी देखील शासनाच्यावतीनं मदत जाहीर केलीय. हा अपघात दुर्दैवी आहे". - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सत्य बाहेर येईल : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, " धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी करण्यात आली. मात्र संतोष देशमुख प्रकरणात एसआयटीची स्थापना केली आहे. सीआयडी चौकशी करत आहे. एसआयटीतील आक्षेप असणारे कर्मचारी बदलले आहेत. विधीज्ञ उज्वल निकम यांना देखील नेमलं. कोणी राजीनामा मागितला, तरी चौकशी करावी लागते. यासोबतच ते पुढे म्हणाले की, सत्य बाहेर येईल".
पालकमंत्र्यांमध्ये राज्यात रस्सीखेच सुरू : "बहुमत मिळाल्यामुळं लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मंत्र्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. प्रत्येकाला वाटतं की, आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री असावा. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिन्ही नेते बसून तोडगा काढतील" असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
हेही वाचा -
- जळगाव रेल्वे अपघात: मृतांचा आकडा वाढला, मृत प्रवाशांची नावं आली समोर, नेपाळमधील 'इतक्या' प्रवाशांचा समावेश
- आगीच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या, बंगळुरू एक्स्प्रेसनं 11 जणांना चिरडलं
- जळगाव रेल्वे अपघातात किमान १२ ठार, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी एका रेल्वेतून मारल्या उड्या, दुसऱ्या रेल्वेने चिरडलं